साताऱ्यात दुसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:38 AM2021-04-11T04:38:17+5:302021-04-11T04:38:17+5:30
सातारा : सातारा शहरात शनिवारी दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने उकाडा कमी झाला ...
सातारा : सातारा शहरात शनिवारी दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने उकाडा कमी झाला होता. तर अजूनही दोन दिवस पावसाचा अंदाज असल्याने गारपिटीच्या भीतीने फळबागधारक शेतकऱ्यांत धास्ती निर्माण झाली आहे. दरम्यान, वाई शहरातही दुपारच्या सुमारास विजेच्या कडकडाटात पाऊस झाला.
सातारा जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत आहे. यामुळे कमाल तापमानात घट झाली आहे, तर उकाडाही कमी जाणवत आहे. त्यातच शुक्रवारी दुपारी साडेचारनंतर सातारा शहर व परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते.
शनिवारी दुसऱ्या दिवशीही सकाळपासून सातारा शहराबरोबरच जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास सातारा शहरात चांगला पाऊस झाला. यामुळे लॉकडाऊन बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांना निवाऱ्याला थांबावे लागले. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
दरम्यान, वाई शहरातही शनिवारी दुपारच्या सुमारास अवकाळी पाऊस झाला. जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटात चांगला पाऊस पडला. यामुळे उकाडा कमी झाला.
..........................................................