हिवाळ्यात पावसाळा; साताऱ्यात दुसऱ्या दिवशीही अवकाळी, नागरिकांची त्रेधातीरपीट
By नितीन काळेल | Published: January 10, 2024 06:24 PM2024-01-10T18:24:45+5:302024-01-10T18:26:17+5:30
सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे हिवाळ्यात पावसाळा ऋतु अनुभवावा ...
सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे हिवाळ्यात पावसाळा ऋतु अनुभवावा लागला. तर सातारा शहरात जवळपास दीड तास पावसाची रिपरिप सुरू होती. यामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट झाली. तसेच सायंकाळी शाळा सुटूनही विद्यार्थ्यांना पावसामुळे वेळेत घरी जाताा आले नाही.
जिल्ह्यातील नागरिकांना मागील चार दिवसांपासून वेगवेगळ्या वातावरणाचा अनुभव घ्यावा लागत आहे. कधी थंडी पडत आहे. तर काहीवेळा ढगाळ वातावरण तयार होत आहे. त्यातच दोन दिवसांपासून अवकाळी पावसाशी सामना करावा लागत आहे. सातारा शहरात तर मंगळवारपासून अवकाळी पाऊस होत आहे. यामुळे दोन दिवसांपासून नागरिकांना सूर्यदर्शनही झाले नाही. बुधवारी तर दुपारी तीननंतर गडद ढगाळ वातावरण तयार झाले होते. चारच्या सुमारास शहरासह परिसरात पावसाला सुरूवात झाली. प्रथम काही भागात जोरदार सरी पडल्या.
मात्र, त्यानंतर रिपरिप सुरू झाली. सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत अवकाळीचा पाऊस सुरू होता. या पावसामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. जवळपास एक तासभरतरी त्यांना सुरक्षित ठिकाणी थांबावे लागले. तर बहुतांशी शाळा सायंकाळच्यावेळी बंद होतात. त्यामुळे शाळा सुटूनही विद्यार्थ्यांना पावसाची रिपरिप असताना थांबून राहवे लागले. पाऊस थांबल्यानंतर विद्यार्थी घरी गेले. तर सातारा शहरात पाऊस असल्याने सर्वच रस्त्यावर छत्री घेऊन चाललेले नागरिक दिसून आले. बुधवारी सायंकाळी झालेल्या या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला होता.
सातारा शहराबरोबरच जिल्ह्यातील काही ठिकाणीही अवकाळीने हजेरी लावली. या पावसात जोर नसलातरी वातावरणात बदल झाला आहे. तसेच ढगाळ हवामान आणि धुक्यामुळे पिके आणि फळबागांनाही धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फळबागांवरतरी रासायनिक औषधांची फवारणी करावी लागणार आहे.