Satara: वाई, जावळी तालुक्याला अवकाळीने झोडपले
By नितीन काळेल | Published: April 22, 2024 07:01 PM2024-04-22T19:01:07+5:302024-04-22T19:01:18+5:30
सर्वत्र पाणीच पाणी
सातारा : जिल्ह्यात पारा वाढत असल्याने उकाड्याने घामाघूम होण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. असे असतानाच सोमवारी दुपारनंतर वाई आणि जावळी तालुक्यात काही ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस झाला. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. तर या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
एप्रिल महिना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात उन्हाळी झळा तीव्र झाल्या आहेत. सातारा शहरासह बहुतांशी भागातील कमाल तापमान हे ४० अंशादरम्यान राहत आहे. यामुळे दिवसा कडक उन्हाशी सामना करावा लागत आहे. तर रात्रीच्या सुमारास उकाड्याने बैचेन होण्याची वेळ आलेली आहे. तसेच कडाक्याच्या उन्हाने शेती, बाजारपेठेवरही मोठा परिणाम झालेला आहे. या उन्हापासून सुटका होण्यासाठी नागरिक दुपारच्या सुमारास घरी किंवा झाडाच्या सावलीत बसत आहेत. घराबाहेर जाणेही टाळले जात आहे. अशातच मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस होत आहे. यामुळे हवेत गारवा निर्माण होत असल्याने लोकांना उकाड्यापासून दिलासा मिळत आहे.
सोमवारी तर दुपारी अडीचच्या सुमारास जावळी तालुक्यातील आनेवाडी परिसरात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच वाई तालुक्यातील विरमाडे, पाचवड या भागात पाऊस पडला. वाऱ्यासह हा पाऊस झाला. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत होते. तर पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरुन धावणारी वाहने लाईट लाऊन जात होती. जवळपास १० मिनीटे पाऊस पडला. पण, यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. त्याचबरोबर वाई तालुक्यातील भुईंज परिसरातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच अन्य काही ठिकाणीही अवकाळी पाऊस झाला.