ऐन दिवाळीत अवकाळी पाऊस : खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची पळापळ
By नितीन काळेल | Published: November 10, 2023 04:01 PM2023-11-10T16:01:45+5:302023-11-10T16:05:22+5:30
साताऱ्यात ऐन दिवाळीत अवकाळी पावसाची हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
सातारा : जिल्ह्यात चार दिवसांपासून अवकाळी ढग असून सातारा शहरात तर शुक्रवारी सकाळच्या सुमारासच पाऊस झाला. यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची पळापळ झाली. तर दुपारपर्यंत ढगाळ वातावरण कायम होते. सातारा जिल्ह्यात चार दिवसांपासून अवकाळीचा फेरा सुरू झाला आहे. कऱ्हाड, पाटण तालुक्यात तीन दिवसांपूर्वी चांगला पाऊस झाला. या पावसाने खरीप हंगामातील पिकांना दणका दिला.
भात, सोयाबीन पीक काढणीस आलेले आहे त्यावर पावसाचा परिणाम झाला आहे. तर जमिनीत पाणी साठल्याने ऊसतोडी बंद झाल्या आहेत. तसेच कऱ्हाड आणि पाटण तालुक्यात ऊसतोडीसाठी मजूर आले आहेत. त्यांच्या कोपीत पावसाचे पाणी गेल्याने संसार उघड्यावर आले. या अवकाळी पावसाचा फटका पश्चिम भागातच अधिक बसला आहे. असे असलेतरी माण, खटाव तालुक्यात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कारण, सध्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी केली आहे. पीक उगवून आल्याने पाणी मिळाले आहे. तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठीही हा पाऊस उपयुक्त ठरला.
मागील चार दिवसांत जिल्ह्यात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. तर कोठे ढगाळ वातावरण तयार होत आहे. असे असतानाच सातारा शहरात शुक्रवारी सकाळीच रिमझिम स्वरुपात पाऊस पडला. यामुळे बाजारपेठेत तुरळक लोक दिसून आले. सध्या दिवाळी सणानिमित्ताने बाजारपेठ सजली आहे. यातच पाऊस होत असल्याने नागरिकांना वातावरण पाहूनच बाहेर पडावे लागत आहे.