जिल्ह्यात अवकाळीचा फटका सुरूच...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:32 AM2021-01-09T04:32:29+5:302021-01-09T04:32:29+5:30
सातारा : जिल्ह्यात सहा दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून काहीवेळा अवकाळी पावसाचाही दणका बसत आहे. यामुळे बळिराजात धास्ती असून ...
सातारा : जिल्ह्यात सहा दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून काहीवेळा अवकाळी पावसाचाही दणका बसत आहे. यामुळे बळिराजात धास्ती असून पिके आणि फळबागांवर औषध फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढत चालला आहे.
जिल्ह्यातील बळिराजा मागील चार-पाच वर्षांपासून सतत निसर्गाशी सामना करत आला आहे. कधी दुष्काळाचा, तर काहीवेळा अतिवृष्टीशी मुकाबला करावा लागतोय. अधूनमधून अवकाळी पाऊसही तडाखा देत आहे. यामुळे सावरुन उभा राहायचे म्हटले तरी पुन्हा आणखी फटका बसतो. जिल्ह्यात चार महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत तर २५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातून शेतकरी कसाबसा सावरत असतानाच आता अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांत चिंता निर्माण झालेली आहे. गेल्या सहा दिवसांपासून पिकांसाठी खराब वातावरण तयार झालेले आहे. त्यामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू, हरभरा, मका अशी पिके घेतली आहेत. या पिकांवर रोग पडण्याची अधिक शक्यता आहे, तर डाळिंब आणि द्राक्षसारख्या बागांवरही रोगाचे अतिक्रमण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळिराजा कीटकनाशकांची फवारणी करून पिके वाचविण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.
फोटो दि.०८सातारा अॅग्रो फोटो...
फोटो ओळ : ढगाळ वातावरण तयार होत असल्याने कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात कांदा पिकांवर शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करू लागले आहेत.
...................................................