‘अजिंक्यतारा’ची बिनविरोध हॅट्ट्रिक
By admin | Published: March 29, 2016 10:14 PM2016-03-29T22:14:52+5:302016-03-29T23:52:08+5:30
शिवेंद्रसिंहराजे भोसले : कारखान्याचा ४० लाख रुपये खर्च वाचल्याचा दावा; कारखाना विद्युतबाबतीतही स्वयंपूर्ण
सातारा : ‘अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सभासदांच्या एकीमुळे सलग तिसऱ्यांदा बिनविरोध झाली आहे. बिनविरोधच्या हॅट्ट्रिकमुळे कारखान्याचा ४० लाखांचा खर्च वाचला असून, विविधांगांनी कारखाना स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न सभासदांच्या विश्वासामुळे फलदायी ठरत आहे,’ अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दिवंगत अभयसिंहराजे भोसले शेंद्रे येथील उजाड माळरानावर अजिंक्यारा कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या अकाली निधनानंतरही त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सभासदांच्या मदतीने मी झटत आहे. अनेक अडचणींवर मात करून यंदाच्याही गळीत हंगामात शासन निर्धारित एफआरपीनुसार प्रती टनाला २३९२.६२ रुपये एवढा दर निश्चित झालेला आहे. त्यापैकी प्रतिटन २०१५ रुपये रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वेळेत जमा करण्यात आली आहे.
२०१५-१६ च्या गळीत हंगामाला दि. ८ नोव्हेंबरला प्रारंभ होऊन आजअखेर ५ लाख ९१० मे. टन उसाचे गाळप करून सरासरी १२.६७ टक्के साखर उताऱ्याने ६ लाख ७ हजार ९९० क्विंटल साखरेचे उत्पादन घेण्यात आले आहे. या गळीत हंगामात गाळपाचे एकूण उद्दिष्ट ६ लाख मे. टन असून, प्रतिदिन सुमारे ३,७७५.७० मे. टनाचे गाळप सुरू असून उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कारखान्याकडून प्रयत्न सुरू आहेत. या गळीत हंगामात डिस्टिलरी विभागात आज अखेर ३१ लाख ७३ हजार लिटर रेक्टिफाईड स्पिरिटचे उत्पादन झाले असून, इथेनॉलचे १७ लाख ६६ हजार लिटर उत्पादन झाले आहे. आत्तापर्यंत आॅईल मार्केटिंग कंपनीला ११ लाख २० हजार लिटर इथेनॉल विक्री केली आहे. उसाला किफायतशीर दर व तालुक्यातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, यासाठीच या उद्देशाने कारखान्याचे कामकाज सुरू आहे, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)