अप्रशिक्षित हात ठरतायत धोकादायक
By admin | Published: January 13, 2016 12:20 AM2016-01-13T00:20:53+5:302016-01-13T01:09:20+5:30
तरुणांमध्ये मोठी क्रेझ : आयुष्यभर राहतायत चुकीच्या टॅटूच्या खुणा
प्रगती जाधव-पाटील- सातारा‘फॅशन स्टेटमेंट म्हणून तरुणाईला आता गोंदण अर्थात टॅटू काढणं खूपच हक्काचं वाटू लागले आहे. सौंदर्यात भर टाकणं आणि व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणं अशासाठी टॅटू काढण्याची क्रेझ अधिक आहे. पण टॅटू काढणारे अप्रशिक्षित हात अलीकडे धोकादायक ठरू लागले आहेत.गेल्या काही वर्षांमध्ये साताऱ्यात टॅटू काढण्याची क्रेझ चांगलीच वाढली आहे. पूर्वी टॅटू काढायचे म्हटले की महानगरांची वारी ठरलेली असायची. महानगरांमध्ये असलेल्या प्रशिक्षित कलाकारांची वेळ घेऊन टॅटूचे परिणाम-दुष्परिणाम यांची माहिती देऊनच मग टॅटू काढले जात होते. त्यामुळे हे टॅटू खूपच महाग होते. पण त्वचेवर कोणताही दुष्परिणाम होणार नाही आणि निवडलेली डिझाईन जशीच्या तशी दिसणार याची खात्री होती.सातारा जिल्ह्यात टॅटू काढणाऱ्या कलाकारांची संख्या चांगलीच वाढलेली दिसते. शहरातही गल्ली-बोळांमध्ये टॅटू काढून मिळू लागले आहेत. महागडे टॅटू अगदी कमी किमतीत काढून मिळायला लागल्यामुळे युवकांच्या झुंडी या टॅटू दुकानाच्या बाहेर दिसू लागल्या. मात्र, टॅटू काढल्यानंतर काही दिवसांत त्वचा खराब होणे, त्यात पस होणं, टॅटू काढलेली जागा अतिरिक्त सुजणं असे काही प्रकार घडू लागले आहेत. कित्येकदा टॅटू काढण्यासाठी आवश्यक असणारी सुई आणि त्यावर लावण्याचे क्रीमही निकृष्ट दर्जाचे वापरलेले असते. त्यामुळेही त्वचेला नुकसान पोहोचत आहे. अचूकता हे टॅटू काढण्याचे गमक आहे. त्यामुळे प्रशिक्षित हातच अपेक्षित टॅटूचे डिझाईन त्याच्या बारकाव्यांसह काढून देऊ शकतात. कित्यकदा ‘सांगितला गणपती आणि काढला मारुती’ अशी अवस्था तरुणांची होते आणि मग कलाकाराची चूक आयुष्यभर आपल्या अंगा-खांद्यावर वागविण्याशिवाय तरूणांना पर्याय राहत नाही.
प्रशिक्षितांची सुबकता
प्रशिक्षण घेऊन सराव केलेल्या कलाकारांना त्वचेचे थर आणि त्यावर काढण्यात येणारी कला कशी दिसेल याचा अंदाज असतो. कोणत्याही चेहऱ्याचा जिवंतपणा दाखविण्यासाठी त्याचे डोळे बोलके असावे लागतात. डोळ्यात हा जिवंतपणा आणण्यासाठी सरावाची गरज असते. प्रशिक्षित हातांतून साकारलेली कलाकृती सुबक, डोळ्यांना अल्हाददायक आणि आकर्षक दिसते. त्यातील प्रत्येक रेष स्पषट दिसते.
दोनशेहून अधिक नवखे कलाकार व्यवसायात
सातारा जिल्ह्यात टॅटू काढणाऱ्या नवख्या कलाकारांचे प्रस्थ चांगलेच वाढू आहे. यांची कोठेही नोंदणीकृत संस्था नाही. पण ओळखीवर हा व्यवसाय सध्या जोरात सुरू आहे. दोनशे रूपयांपासून हे नवकलाकार टॅटू काढून देतात. तर व्यावसायिक कलाकार यासाठी किमान हजार रुपये घेतात. त्वचेच्या तिसऱ्या स्तरापर्यंत टॅटू काढणं सुरक्षित मानले जाते.
तरुणांबरोबरच प्रोफेशनल्सह टॅटूच्या प्रेमात
साताऱ्यात महाविद्यालयीन तरुण-तरुणींबरोबरच काही व्यावसायिक या टॅटूच्या प्रेमात पडले आहेत. पाठीवर, मानेवर, दंडावर, हातावर टॅटू काढण्याची क्रेझ सातारकरांमध्ये दिसते.
प्रशिक्षित हातांनी काढलेला टॅटू तुमचे व्यक्तिमत्त्व खुलवते तर अप्रशिक्षित हात सौंदर्यावर डाग बनून राहतो. कोणत्याही कलाकाराकडून टॅटू काढून घेताना त्याचे प्रशिक्षण प्रमाणपत्र तपासले तरीही तरुणाईची फसगत होणार नाही.
-कृष्णा पातुगडे, टॅटू कलाकार, वाई
टॅटू काढताय?
टॅटू काढण्यापूर्वी त्याचे शरीरावर काय परिणाम होणार याची माहिती घ्या
टॅटू काढल्यानंतर त्याची घ्यावयाची काळजी नीट समजून घ्या
मित्राने काढले म्हणून त्याच्यासारखेच काढा हे म्हणणे सोडा
आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा म्हणून टॅटू आर्टकडे बघा
टॅटूचे डिझाईन पसंत करताना त्याचे अधिकाधिक पर्याय निवडा
टॅटू काढण्याचा निर्णय घाई-गडबडीत घेऊ नका
सातारकरांना नावांची क्रेझ अधिक
साताऱ्यातील बहुतांश तरुणाईच्या अंगा-खांद्यावर टॅटू आर्ट दिमाखात विराजमान झाली आहे. तरुणाईसह अनेक पुरुषांनी पत्नी, मुलगी, आई यांच्या नावाचे टॅटू काढले आहे. तरुणींचा ओढा फुले आणि पानांच्या डिझाईनकडे असतो. काहीजण देवांच्या छबी, राजमुद्रा, शिवाजीराजे यांचा टॅटू काढून घेतात, तर काही व्यावसायिक लोक ‘अॅब्सट्रॅक्ट आर्ट’ काढण्याला पसंती देतात.