साताऱ्यात जिल्हा बँकेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2021 02:02 PM2021-12-15T14:02:33+5:302021-12-15T14:04:10+5:30

राजधानी सातारा जिल्ह्यात राजकारणाच्या तोफा धडधडू लागल्या आहेत. जिल्हा बँक निवडणुकीतील कवित्व याला कारणीभूत ठरले आहे. नेतेमंडळी शेलक्या शब्दांमध्ये एकमेकांचा समाचार घेताना पाहायला मिळतात.

Upcoming local body elections in Satara district | साताऱ्यात जिल्हा बँकेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रंगत

साताऱ्यात जिल्हा बँकेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रंगत

googlenewsNext

सागर गुजर

सातारा : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजधानी सातारा जिल्ह्यात राजकारणाच्या तोफा धडधडू लागल्या आहेत. जिल्हा बँक निवडणुकीतील कवित्व याला कारणीभूत ठरले आहे. नेतेमंडळी शेलक्या शब्दांमध्ये एकमेकांचा समाचार घेताना पाहायला मिळतात.

आमदार शशिकांत शिंदे यांनी जिल्हा बँकेतील पराभवाला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे जबाबदार असल्याचा आरोप केला तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही आमदार शशिकांत शिंदे यांच्या वक्तव्याचा वेळोवेळी समाचार घेतला. त्यांना थंड करण्याची ताकद आमच्यात आहे, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केले आहे.

पाटण सोसायटी मतदार संघामध्ये पराभूत झाल्यानंतर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे देखील अस्वस्थ आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर विश्वास राहिला नसल्याचे त्यांनी म्हटले होते. यासोबतच शिवसेनेवर टीका करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचादेखील मंत्री देसाई यांनी समाचार घेतला.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या आग्रहाखातर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव महाडिक यांना पक्षाने या मतदार संघांमध्ये तिकीट दिले होते; परंतु राष्ट्रवादीने पाय ओढण्याचे काम केल्यामुळे महाडिक यांना अपेक्षित मते पडली नाहीत. राष्ट्रवादीचा गट आणखी मजबूत करणार असल्याचे नितीन पाटील यांनी कोरेगावात सांगितले. तसेच सुनील माने यांनादेखील अप्रत्यक्षरित्या पक्षासोबत राहण्याचा सल्ला दिला आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये रामराजेंच्या शब्दाखातर उदयनराजेंना शिवेंद्रसिंहराजेंनी विरोध केला नाही. आता आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन राजांमध्ये योजनेच्या लोकार्पण कार्यक्रमांमध्ये उदयनराजेंनी नगर विकास आघाडीच्या राजकारणावर टीका केली होती.

काय म्हणतायत नेते मंडळी..

कण्हेर योजना पूर्ण व्हावी, यासाठी आम्ही अनेकवेळा विनंती अर्ज केले; मात्र आम्हाला श्रेय मिळेल या संकुचित हेतूने ही चांगली योजना गुंडाळण्यात आली होती. आता ही योजना मार्गी लागलेली आहे. - खासदार उदयनराजे भोसले

राजकारणामध्ये संधी मिळत असते. एकदा संधी मिळाली नाही म्हणून नाराज होऊन पक्षाच्या विरोधात जाण्याचा निर्णय चुकीचा आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोरेगाव सोसायटी मतदारसंघात राष्ट्रवादीने राष्ट्रवादीचा पराभव केला. आता पुन्हा या मतदार संघांमध्ये राष्ट्रवादीची बांधणी केली जाईल. - नितीन पाटील, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक

शिवसेनेचे बोट धरूनच भाजप मोठा झाला आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यासोबत शिवसेनेने भाजपला साथ दिली म्हणून तर आज केंद्रात मजल मारता आलेली आहे. चंद्रकांत पाटील यांनी इतिहास तपासावा. - गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

भाऊसाहेब महाराजांचे नाव घेऊन सातारा तालुक्यात राजकारण करण्याचा काहींचा प्रयत्न आहे. आम्ही त्यांची चाल आधीच ओळखली आहे आणि त्यामुळेच आम्ही सावध झालो आहोत. त्यांनी कितीही राजकारण तापविण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही त्यांना थंड करूनच घरी पाठवू. - आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

Web Title: Upcoming local body elections in Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.