‘यूपीएससी’त सातारचा चौकार!

By admin | Published: July 5, 2015 01:11 AM2015-07-05T01:11:53+5:302015-07-05T01:12:25+5:30

खोवला मानाचा तुरा : दुष्काळी माण-फलटण तालुक्यातील सुपुत्र चमकले

'UPSC' Fourth boundary! | ‘यूपीएससी’त सातारचा चौकार!

‘यूपीएससी’त सातारचा चौकार!

Next

सातारा : केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत सातारा जिल्ह्यातील दुष्काळी समजल्या जाणाऱ्या माण-फलटणच्या सुपुत्रांनी यशाचा ‘चौकार’ ठोकला आहे. या चौघांमध्ये माणच्या बुद्धिवंतांच्या खाणीतील तीन रत्ने आहेत. तर एक जण फलटण तालुक्यातील सुरवडी गावचा असून गवंड्याचा मुलगा आहे.
गवंड्याच्या मुलानं उडविले यशाचे ‘तुषार’!
साखरवाडी : गवंडीकाम करताना आयुष्यभर दगड,माती अन् दगडांशी नातं जपलेल्या सुरवडी येथील शांताराम मोहिते यांनी इतरांच्या घरांचा पाया रचला अन् विटांचे थर रचून घरांना सुंदर आकार दिले. दुसऱ्याचं जगणं सुंदर करण्यासाठी राबलेल्या हातांचे कष्टही वाया गेले नाहीत. गवंडी काम करणाऱ्या शांताराम मोहिते यांचा मुलगा तुषार यांने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशाचे ‘तुषार’ उडवून ‘क्लासवन’ अधिकारी बनला आहे.
फलटण तालुक्यातील सुरवडी हे एक खेडेगाव आहे. शांताराम दादू मोहिते हे गवंडी काम करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत. दोन मुले व एक मुलगी यांच्या शिक्षणासाठी ते कष्ट उपसत होते. मुलांनी उत्तम शिक्षण घेऊन चांगलं जीवन जगावं, यासाठी मोहिते जिवाचं रान करीत. तुषार हा त्यांचा धाकटा मुलगा. अतिशय जिद्दी अन् मेहनती. शिक्षणाची ओढ असल्याने तो सदैव अभ्यासात मग्न असायचा. तुषारचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरवडी येथे झाले.
घरची आर्थिक परिस्थित बेताची असल्यामुळे माध्यमिक शिक्षणासाठी तुषार पिंपरद येथील मामाकडे गेला व शिक्षण पूर्ण केले. फलटण येथील शेती विद्यालयातून ७३ टक्क्यांनी उत्तीर्ण झाल्यानंतर पुणे येथील महात्मा फुले शेती महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
तुषारने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. जिद्द, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्य या जोरावर २०११ मध्ये यूपीएससी परीक्षेत यश मिळविले. या काळात मित्रांनी मोलाचे सहकार्य केले. तुषार मोहिते सोलापूर येथे भारतीय राजस्व सेवा विभागात कार्यरत आहेत. त्यांनी पुन्हा २०१४-१५ मध्ये यूपीएससी परीक्षा दिली. या परीक्षेत तुषार मोहितेंनी देशात ४७० क्रमांक मिळवित ‘आयएएस’ होण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले आहे. (वार्ताहर)
वडगावचा सुपुत्र बनला ‘आयएएस’ अधिकारी
म्हसवड : माण तालुक्यातील वडगाव या खेडेगावातला सुपुत्र डॉ. सचिन ओंबासेने ‘यूपीएसससी’ परीक्षेत देशात १६४ क्रमांक संपादन करीत आयएएस होण्याचे स्वप्न साकार केले आहे. गावचा सुपुत्र जिल्हाधिकारी झाल्याचा आनंद वडगावकरांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत आहे.
सचिन ओंबासेचे प्राथमिक शिक्षण दहिवडी येथे आदर्श प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर मंचर येथे माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. वडील प्राध्यापक असल्याने घरातून शिक्षणाचा वारसा मिळाला. सचिन यांनी मेडिकलची पदवी घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. त्यांनी २०१०-११ मध्ये यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली व आयआरएस पद स्वीकारले. त्यानंतर २०१३-१४ मध्ये लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून आयपीएस पद मिळविले. ते हैदराबाद येथे ट्रेनिंग घेत आहेत. त्यातच पुन्हा यूपीएससी परीक्षेत १६४ व्या क्रमांकाने यश संपादन करून आयएएस पदी निवड झाली आहे. तब्बल चारवेळा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याचा मान सचिन ओंबासे यांनी मिळविला आहे.
‘आयएएस’ होण्यासाठी सात वर्षे अभ्यास केला. चिकाटी सोडली नाही. आयआरएस, आयपीएस या माध्यमातून ठरावीक क्षेत्रात काम करता येते. मात्र, आयएएसच्या माध्यमातून सर्व क्षेत्रात काम करू शकतो, असे मत डॉ. सचिन ओंबासे यांनी व्यक्त केले. अभ्यासात सातत्य असेल तर यश नक्की मिळते, असाही सल्ला त्यांनी दिला. (प्रतिनिधी)
‘एमपीएससी’नंतर आता ‘यूपीएससीत’ही ‘विक्रम’!
म्हसवड : बँकेची नोकरी सांभाळून आठ तास काम करून पुन्हा घरी आल्यानंतर सायंकाळी ६ ते पहाटे तीनपर्यंत जागून अहोरात्र कष्ट करणाऱ्या वीरकरवाडी, ता. माण येथील विक्रम जगन्नाथ वीरकर याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ८९२ क्रमांक मिळवत यश संपादन केले.
म्हसवडपासून पाच किलोमीटर असणाऱ्या वीरकरवाडी ता. माण येथील विक्रम रहिवाशी असून त्याचे वडील जगन्नाथ वीरकर हे प्राथमिक शिक्षक आहेत. सध्या ते कलेढोण, ता. खटाव येथे केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. तर आई म्हसवड पालिकेच्या माजी नगराध्यक्षा आहेत. त्याचा मोठा भाऊ संग्राम हा एमबीए शिक्षण पूर्ण करून पुणे येथे कंपनीत नोकरी करत आहे. बहीण विवाहित असून तिनेही डीएड शिक्षण पूर्ण केले आहे. वीरकर कुटुंबातील सगळ्यांनाच शैक्षणिक वारसा मिळालेला आहे. विक्रमचे पाचवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण वीरकरवाडीतील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. ६ वी ते १२ वीपर्यंतचे शिक्षण नवोदय विद्यालय सातारा येथे झाले. त्यानंतर त्याने सांगली येथील वालचंद कॉलेज येथे कॉॅम्प्युटर इंजिनिअरचे शिक्षण पूर्ण करून सध्या तो मुंबई येथे रिझर्व्ह बँकेत व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे.
नोकरी करतच त्याने कोणत्याही क्लासेस शिवाय हे यश मिळविले. पाच वाजता बँकेतून घरी आल्यानंतर तो सायंकाळी सहा वाजता अभ्यासाला बसायचा. ते पहाटे तीनपर्यंत तो अभ्यास करत बसायचा. तब्बल नऊ तास अभ्यास करून तो दुसऱ्या दिवशी बँकेत कामाला जायचा. मात्र त्याने अभ्यासामध्ये कधीही खंड केला नाही.
दरम्यान यापुर्वी विरकरवाडीतील भाऊसाहेब गलांडे व डॉ. जगन्नाथ विरकर यांनी या परीक्षेमध्ये यश मिळविलेले आहे. तर पळशी ता. माण या गावातील नितीन खाडे यांनीही लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले. (प्रतिनिधी)
प्रसाद मेनकुदळेचाही वरचष्मा
म्हसवड : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत माण तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रसाद सुभाष मेनकुदळे याने गुणवत्ता यादीत १,०८५ वा क्रमांक मिळवून यशाची पताका कायम फडकवत ठेवली आहे.
शनिवार फक्त माण तालुक्याचाच होता. केंद्रीय लोकसेवा आयोगाने निकाल जाहीर केल्यानंतर दुपारी गोड बातमी आली. या आनंदातून माणवासीय सावरत नाहीत तोच दुसरी अन् रात्री सव्वानऊच्या सुमारास तिसरीही गोड बातमी ऐकायला मिळाली. त्यामुळे माणमधील तरूणांच्या आनंदाला पारावार उरला नाही. प्रसाद मेनकुदळे २०१० पासून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असून त्याचे आई-वडील निवृत्त शिक्षक आहेत. (प्रतिनिधी)




 

Web Title: 'UPSC' Fourth boundary!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.