भादेच्या पियूषची घरात अभ्यास करून यूपीएससीत बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 12:00 AM2018-05-01T00:00:18+5:302018-05-01T00:00:18+5:30
सातारा : वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून कायदेपंडित बनण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. त्यासाठी स्वत:ला अभ्यासात झोकूनही दिलं.
स्वप्नील शिंदे।
सातारा : वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून कायदेपंडित बनण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. त्यासाठी स्वत:ला अभ्यासात झोकूनही दिलं. वकिलीचा अभ्यास करत असतानाच त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली अन् त्यांनी यशाला गवसणी घातली. खंडाळा तालुक्यातील भादे येथील पियूष साळुंखे यांनी यूपीएससीत केंद्रात ६३ वा तर राज्यात पाचवा क्रमांक पटकावून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
मूळचे भादे येथील रहिवासी असलेल्या पियूष साळुंखे त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षक पुणे येथील सेंट विंसेन्ट हायस्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी इलेक्ट्रिक अँड टेलिकम्युनिकेशनमधून इंजिनिअरिंग पूर्ण केले. दरम्यान, लहानपणापासून वडिलांप्रमाणे वकील होण्याचे स्वप्न ते पाहत होते. म्हणून एलएलबीचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. वकिलीचे शिक्षण घेत असताना त्यांनी यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली.
२०१६ मध्ये त्यांनी पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली. पूर्व परीक्षेत यश मिळाले. मात्र, मुख्य परीक्षेत स्कोर कमी आल्याने अपयश आले. पहिल्या प्रयत्नात अपयशामुळे काही प्रमाणात निराशा आली. दरम्यान, आई-वडील आणि मित्रांनी समजूत काढून पुन्हा जोरात प्रयत्न करण्यास प्रोत्साहन दिले. त्यानंतर निराशा झटकून पियूष यांनी जिद्दीने अभ्यासाला सुरुवात केली. २०१७ च्या पूर्व, मुख्य परीक्षेत यश मिळवून मुलाखतीपर्यंत मजल मारली. पहिलीच मुलाखत असल्याने काही प्रमाणात दडपण होते. तरी न डगमगता त्याला सामोरे गेले. मुलाखत दिल्यानंतर एलएलबीच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा देत पुन्हा यूपीएससीचा अभ्यास सुरू केला अन् अपेक्षितपणे लागलेल्या निकालामुळे विश्वास बसत नव्हता की देशात ६३ वा क्रमांक मिळवला.
मुलाखतीत दृष्टिकोन पाहिला जातो
मुख्य परीक्षेनंतर आयोगातर्फे घेण्यात आलेली मुलाखत केवळ २० मिनिटांची झाली. यावर्षी घेण्यात आलेल्या मुलाखतीत ती सर्वात कमी वेळाची होती. त्यामुळे मुलाखत किती घेतली? हे महत्त्वाचे नाही. तर त्यामध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे भविष्यातील एक प्रशासकीय अधिकारी म्हणून कशा पद्धतीने देतो, हे महत्त्वाचे असते.
लायब्ररी व क्लास न लावता केला अभ्यास
पियूष यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करत असताना ते लायब्ररी व क्लास न लावता केवळ घरी बसून अभ्यास करीत होते. त्याचदरम्यान, एलएलबी, कॉलेज, जिम जाणे, फिल्म पाहणे व मित्र मंडळींमध्ये वेळही घालवत होते.
पदावर रुजू झाल्यानंतर शासनांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी हे मुख्य धोरण असेल. तसेच त्याची अंमलबजावणी करत असताना प्रशासन पारदर्शकपणे चालवण्यावर भर राहील. जिद्द व चिकाटीच्या बळावर कोणतेही ध्येय साध्य करता येते.
- पियूष साळुंखे