भादेच्या पीयूषची घरात अभ्यास करून यूपीएससीत बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 05:00 AM2018-05-02T05:00:55+5:302018-05-02T05:00:55+5:30
वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून कायदेपंडित बनण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. त्यासाठी स्वत:ला अभ्यासात झोकूनही दिले.
स्वप्निल शिंदे
सातारा : वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून कायदेपंडित बनण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. त्यासाठी स्वत:ला अभ्यासात झोकूनही दिले. वकिलीचा अभ्यास करत असतानाच त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि त्यांनी यशाला गवसणी घातली. खंडाळा तालुक्यातील भादे
येथील पीयूष साळुंखे यांनी यूपीएससीत केंद्रात ६३वा तर राज्यात पाचवा क्रमांक पटकावून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
मूळचे भादे येथील रहिवासी असलेल्या पीयूष साळुंखे त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षक
पुणे येथील सेंट विंसेन्ट हायस्कूलमधून
पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी
इलेक्ट्रिक अँड टेलिकम्युनिकेशनमधून इंजिनिअरिंग पूर्ण केले. दरम्यान, लहानपणापासून वडिलांप्रमाणे वकील होण्याचे स्वप्न ते
पाहत होते. म्हणून एलएलबीचे शिक्षण घेण्यास सुरुवात
केली. वकिलीचे शिक्षण
घेत असताना त्यांनी यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करण्यास
सुरुवात केली.
२०१६ मध्ये त्यांनी पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली.
पूर्व परीक्षेत यश मिळाले. मात्र,
मुख्य परीक्षेत स्कोर कमी आल्याने अपयश आले. पहिल्या प्रयत्नात अपयशामुळे काही प्रमाणात निराशा आली. दरम्यान, आई-वडील
आणि मित्रांनी समजूत काढून
पुन्हा जोरात प्रयत्न करण्यास प्रोत्साहन दिले. त्यानंतर निराशा झटकून
पियूष यांनी जिद्दीने अभ्यासाला सुरुवात केली. २०१७ च्या पूर्व,
मुख्य परीक्षेत यश मिळवून मुलाखतीपर्यंत मजल मारली. पहिलीच मुलाखत असल्याने
काही प्रमाणात दडपण होते. तरी न डगमगता त्याला सामोरे गेले.
मुलाखत दिल्यानंतर एलएलबीच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा देत
पुन्हा यूपीएससीचा अभ्यास
सुरू केला अन् अपेक्षितपणे लागलेल्या निकालामुळे विश्वास बसत नव्हता की देशात ६३ वा क्रमांक मिळवला.
लायब्ररी व क्लास न लावता केला अभ्यास
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करीत असताना पीयूष साळुंखे हे लायब्ररी व क्लास न लावता केवळ घरी बसून अभ्यास करीत होते. त्याचदरम्यान, एलएलबी, कॉलेज, जिमला जाणे, फिल्म पाहणे व मित्रमंडळींमध्येही वेळ घालवत होते.
मुलाखतीत दृष्टीकोन पाहिला जातो
मुख्य परीक्षेनंतर आयोगातर्फे घेण्यात आलेली मुलाखत केवळ २० मिनिटांची झाली. या वर्षी घेण्यात आलेल्या मुलाखतीत ती सर्वांत कमी वेळाची होती. त्यामुळे मुलाखत किती वेळ घेतली गेली हे महत्त्वाचे नाही, तर त्यामध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे भविष्यातील एक प्रशासकीय अधिकारी म्हणून कशा पद्धतीने देत आहे, हे महत्त्वाचे असते.