By admin | Published: May 13, 2014 11:12 AM2014-05-13T11:12:11+5:302014-05-13T11:14:34+5:30
रविवारी दुपारी पोहण्यास गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याने गेल्या चार-पाच वर्षांत आतापर्यंत या धरणाने घेतलेल्या बळींची संख्या १४ झाली आहे.
Next
परळी : माण-खटावला वरदायिनी ठरणारे उरमोडी धरण दिवसेंदिवस कोणत्या ना कोणत्या कारणावरून बारमाही चर्चेत आहे. रविवारी दुपारी पोहण्यास गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याने गेल्या चार-पाच वर्षांत आतापर्यंत या धरणाने घेतलेल्या बळींची संख्या १४ झाली आहे. हा जलाशय अजून किती बळी घेणार, अशी चर्चा परिसरात होत आहे. सातारा जिल्ह्यातील एक मोठे धरण म्हणून आणि माण-खटाव या दुष्काळी तालुक्याला वरदान ठरणारे धरण म्हणून ख्याती मिळविलेल्या उरमोडी धरणाचे नाव वेगवेगळ्या कारणांनी कायम चर्चेत आहे. या धरणाने गेल्या पाच वर्षांत तब्बल १४ बळी घेतले आहेत. या जलाशयामध्ये गावातून जाणार्या कोणत्याही रस्त्यावर किंवा असुरक्षित ठिकाणी धोक्याच्या सूचना देणारे फलक बसविलेले नाहीत. तसेच या परिसरात जलाशयालगत सुमारे १५-१६ गावे आणि वाड्या-वस्त्या आहेत. परंतु त्यातील एकाही ठिकाणी धोक्याची सूचना देणारा फलक नाही. परिसरातील हौशी तरुण पोहण्यासाठी जलाशयात जातात. तसेच परिसरातील ग्रामस्थ जनावरे चारण्यासाठीही जलाशयालगतच्या परिसरात वावरतात. पाणी पिण्यासाठी जनावरांना जलाशयाकडे नेतात. शेळी, म्हैस, गाय, बैल अशी १५ ते २0 जनावरे आतापर्यंत या जलाशयात बुडाली आहेत. काही वेळा घरगुती वादातून, प्रेमातील भांडणातून काही तरुणांनी येथे आत्महत्या केल्या आहेत. जलाशयालगत मद्यप्राशन करून धिंगाणा घालणार्यांपैकी काही जण अतिउत्साहामुळे जलाशयात बुडाले आहेत. एवढय़ा घटना घडूनही कृष्णा खोरे विकास महामंडळ किंवा उरमोडी विभागाला अजूनही जाग आलेली नाही. तसेच उरमोडी धरणाची सुमारे तीन किलोमीटर लांबीची भिंत व १0.२0 टीएमसी क्षमतेचा जलाशय असून, संरक्षणासाठी फक्त एकच संरक्षक नेमण्यात आला आहे. त्यामुळे दिवसभरात प्रेमी युगुले, कुटुंबे, मुलांचे गट, हुल्लडबाजी करणारे तरुण, जलाशयात उतरून दंगामस्ती करताना दिसतात. अशा दंगामस्तीमुळे व्यक्ती बुडाल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. दोन आत्महत्या झाल्या असून, जनावरांना पाण्यावर नेण्यासाठी गेलेल्या व्यक्ती बुडाल्याच्या तीन तर पोहण्यासाठी पाण्यात उतरलेल्या व्यक्ती बुडून मृत्युमुखी पडल्याच्या सहा घटना घडल्या आहेत. या प्रकारांना आणि बळींना कधी आळा बसणार आणि हा जलाशय आणखी किती बळी घेणार, असा प्रश्न परिसरातून उपस्थित होत आहे. (वार्ताहर) फलक केव्हा लागणार? ■ उरमोडी जलाशयानजीक सुमारे १५-१६ गावे आहेत. चार-पाच ठिकाणी धोकादायक क्षेत्र आहे. परंतु त्याठिकाणी कोणतेही धोक्याचे फलक लावलेले नाहीत. सूचना व मार्गदर्शन नव्याने येणार्यांना मिळत नाही. केवळ पावसाळ्यातच पाण्याची पातळी दर्शविणारे फलक लावले जात असल्याने धोक्याची सूचना आपोआप मिळते. एरवी, विशेषत: उन्हाळ्य़ात गर्दी जास्त असताना धोक्याची सूचना मिळतच नाही.