उरमोडी, टेंभू, जिहे-कठापूर योजनांना गती देणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 12:34 PM2023-06-23T12:34:13+5:302023-06-23T12:34:29+5:30
मुंबई बंगळुरू काॅरिडोरमधून म्हसवडला एमआयडीसी करायची आहे. त्याबाबतच्या मान्यता पूर्णत्वाला गेल्या आहेत
कऱ्हाड : ‘सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागाला पाणी देणाऱ्या उरमोडी, टेंभू, जिहे-कठापूर या प्रकल्पांच्या कामाचा आढावा गुरुवारी अधिकाऱ्यांकडून घेतला आहे. या कामाला गती देण्यासाठी फेर प्रशासकीय मान्यता घेऊन त्यांना निधी देण्यासंदर्भात आम्ही निर्णय घेतले आहेत. लवकरच त्याबाबत कार्यवाही होईल,’ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कऱ्हाड दौऱ्यावर होते. त्यावेळी माध्यमांशी बोलत होते. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, डॉ. अतुल भोसले, विक्रम पावसकर, ॲड. भरत पाटील, आदींची उपस्थिती होती.
तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आषाढीला पंढरपूरला येणार आहेत? याबाबत विचारले असता, ‘मला हे तुमच्याकडूनच कळतंय असे सांगत फडणवीस म्हणाले, ‘पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे. येथे सगळेजण येऊ शकतात. फक्त ज्यांना यायचं आहे त्यांनी भक्तिभावाने जरूर यावे. पण राजकारणासाठी येऊ नये असे मला वाटते, असे ते म्हणाले. चंद्रशेखर राव यांना तुम्हाला शह देण्यासाठी बोलवले जात आहे? असे विचारताच ‘तुम्हाला असलेच विषय बातमीसाठी लागतात,’ असे म्हणत त्यांनी स्मितहास्य केले.
मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला आहे? याबाबत विचारताच रखडलाय कुठे? असा प्रतिप्रश्न करत लवकरच विस्तार होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यातील भाजपचे नेते उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात बुधवारी झालेल्या वादाविषयी विचारले असता, अशा गोष्टी होत असतात, पण तिथे काही गंभीर घडले आहे, असे नाही. ते फारसे अडचणीचे नाही, असे ते म्हणाले.
जमिनीचे अधिग्रहण सुरू करणार
मुंबई बंगळुरू काॅरिडोरमधून म्हसवडला एमआयडीसी करायची आहे. त्याबाबतच्या मान्यता पूर्णत्वाला गेल्या आहेत. त्याचाही आढावा गुरुवारी शासकीय अधिकाऱ्याकडून घेतला. लवकरच आम्ही जमीन अधिग्रहण सुरू करणार असल्याचेही फडणवीस यांनी या वेळेला सांगितले.