उरमोडीच्या पाण्याबद्दल राजकारण नको
By admin | Published: August 28, 2016 11:57 PM2016-08-28T23:57:13+5:302016-08-28T23:57:13+5:30
जयकुमार गोरे : पाणीपूजन उत्साहात; पळशीत बंधारे भरायला प्रारंभ
पळशी : ‘माण तालुक्यातील अनेक पिढ्यांनी पाण्याची चातकाप्रमाणे वाट पाहिली आहे. या भागात पाणी येऊन दुष्काळी कलंक पुसला जावा, अशी कित्येक वर्षांपासून जनता अपेक्षा करत आहे. आजचा दिवस माणगंगा नदीसाठी ऐतिहासिक आहे. उरमोडीच्या पाण्याने माणगंगेवरील बंधारे भरत असून, अपेक्षा पूर्ण होत आहे. या पाण्यासाठी गेली सात वर्षे जीवापाड परिश्रम केले आहे. पाण्याचे मोल जाणून त्याचा काटकसरीने वापर करा. या पाण्याबाबत कुणीही राजकारण करू नका,’ असे आवाहन आ. जयकुमार गोरे यांनी केले.
पळशी, ता. माण येथे उरमोडीच्या पाण्याचे पूजन केल्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी म्हसवडचे नगराध्यक्ष रवींद्र वीरकर, माजी नगराध्यक्ष विजय धट, दादासाहेब काळे, सोमनाथ भोसले, डी. एम. अब्दागिरे, लुनेश वीरकर, अकील काझी, बाळासाहेब पिसे, अॅड. दत्तात्रय हांगे, लक्ष्मण माळवे, उद्धव लव्हाळे, संजय खाडे, दिलीप खाडे, तुकाराम खाडे, एल. डी. खाडे, रघुनाथ हांगे, एकनाथ सावंत, आनंदा देवकुळे, अण्णा नाकाडे, राजू जाधव, उमेश पाटोळे, सागर हांगे व ग्रामस्थ उपस्थित होते.
आ. गोरे म्हणाले, ‘गेल्या सात वर्षांपूर्वी मी माण-खटावच्या जनतेला पाणी आणण्याचे स्वप्न दाखविले. पहिल्यांदा आमदार होताना साडेतीन वर्षांत पाणी आणण्याचा शब्द दिला. दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी अहोरात्र परिश्रम केले. जनतेच्या विश्वासावर प्रयत्नांची वाटचाल सुरू ठेवल्याने प्रयत्नांना यश आले. उरमोडीचे पाणी साडेतीन वर्षांत खटावला व नंतर पुढे माण तालुक्यात आणले, प्रयत्न करणाऱ्यांवरच टीका केली जाते. गोड फळे देणाऱ्या आंब्याच्या झाडालाच दगड मारले जातात. या निसर्ग नियमाप्रमाणे पाण्यासाठी काहीच योगदान न देणाऱ्यांनी आणलेल्या पाण्याबाबत गळे काढले. काही महाभागांनी तर कुठे आहे पाणी? असे म्हणत केकाटायलाही मागेपुढे पाहिले नाही. उरमोडीचे पाणी दोन वर्षे खटाव तालुक्यात आले, माणमध्येही आले. अगदी म्हसवडपर्यंत माणगंगेद्वारे पोहोचले. तरीही सवयीप्रमाणे काहींनी त्यात नेहमीच राजकारण आणले. कोण काय बोलतो, याच्याशी काही देणे-घेणे नाही. माझी बांधिलकी इथल्या जनतेप्रती आहे. इथल्या मातीला दुष्काळी संबोधलेले मला चालणार नाही, त्यासाठी ही धडपड सुरू आहे.’
पावसाळ्यात उरमोडी धरणातून वाया जाणारे पाणी माण-खटावला देण्यात यावे, अशी मागणी अधिवेशनात केली. जलसंपदामंत्र्यांनी सकारात्मकता दाखविली. उरमोडीचे पाणी आता माणमध्ये आले आहे. अॅड. दत्तात्रय हांगे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)
माणमध्ये माझेच सरकार!
‘उरमोडीचे पाणी खूप परिश्रमाने आणलेय. त्यासाठी सात वर्षे खर्ची घातलीत, ते पाणी जपून वापरा, असे सांगतानाच ज्यांना ५ वर्षांत स्वत:च्या अंघोळीपुरतेच पाणी आणता आले नाही. त्यांना पाण्यावर बोलण्याचा अधिकारच नाही,’ असा टोला आ. गोरेंनी लगावला. राज्यात सरकार कुणाचेही असो; माण-खटावमध्ये मात्र जयकुमारचेच सरकार आहे. समोरची जनता बरोबर असेपर्यंत ते कायमच राहील, असेही त्यांनी सांगितले.