उरमोडीचं पाणी माणच्या शेवटच्या टोकापर्यंत

By admin | Published: September 19, 2016 11:20 PM2016-09-19T23:20:43+5:302016-09-20T00:07:16+5:30

जयकुमार गोरेंच्या हस्ते पूजन : वरकुटे मलवडी, मार्डी परिसरातील पाणी प्रश्नासाठी आता शासनाविरोधात लढण्याची भूमिका

Urmodi water till the end of the human body | उरमोडीचं पाणी माणच्या शेवटच्या टोकापर्यंत

उरमोडीचं पाणी माणच्या शेवटच्या टोकापर्यंत

Next

म्हसवड : ‘उरमोडीचे पाणी मते आणि राजकारणासाठी आणलं नाही. आजचा दिवस हा माझ्यासाठी, माणगंगेसाठी आणि सिद्धनाथ नगरीसाठी ऐतिहासिक आहे. उरमोडीचे पाणी माणच्या शेवटच्या टोकापर्यंत आणलं, आता लढाई जिहे-कटापूर, वरकुटे मलवडी परिसरातील १३ गावे व मार्डी परिसरातील १४ गावांच्या पाणीप्रश्नासाठी आहे. शासनाला जाग आणण्यासाठी यापुढील काळात आंदोलन करावे लागेल तरी मागे हटणार नाही,’ असे ठाम प्रतिपादन आमदार जयकुमार गोरे यांनी केले.
म्हसवड, ता. माण येथे माणगंगा नदीत उरमोडी पाण्याच्या पूजन कार्यक्रमानंतर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीच्या सभापती अक्काताई मासाळ, उपसभापती अतुल जाधव, म्हसवडचे नगराध्यक्ष रवींद्र वीरकर, उपनगराध्यक्ष रूपाली कोले, माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा, सोनिया गोरे, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, नितीन दोशी, सुरेश म्हेत्रे, विजय धट, प्रतिभा लोखंडे, वैशाली लोखंडे, मार्केट कमिटीचे सभापती अरुण गोरे, भीमराव पाटील, दिगंबर आगवणे, किरण बर्गे, दादासाहेब काळे, बाळासाहेब माने, विशाल बागल, सोमनाथ भोसले, संजय जगताप, अ‍ॅड. भास्करराव गुंडगे, शंकर वीरकर, डॉ. वसंत मासाळ, मारुती वीरकर, अकिल काझी, बाळासाहेब पिसे, लुनेश वीरकर आदी उपस्थित होते.
आ. गोरे म्हणाले, ‘आजवर निवडणुका आल्या की तोच जाहीरनामा असायचा. त्यामध्ये माण-खटावच्या पाणीप्रश्न व सर्वांगीण विकास हे दोन कायम वाक्ये; पण मी पहिली निवडणूक लढवताना माणच्या मातीला पाणी देणार व सर्वांगीण विकास करणार ही आश्वासने दिली. ती पूर्णत्वास जात असल्याने मला याचा अभिमान आहे. यासाठी अनेक अडचणींवर मात करत अखेर उरमोडीचे पाणी माणच्या मातीत आणण्यात यशस्वी झालो. तरी या पुढील लढाई जिहे-कटापूर योजनेसाठीची आहे. जिहे-कटापूर योजनेसाठी २५० कोटींचा निधी मिळवण्यासाठी, वरकुटे मलवडी परिसरातील १३ गावांचा व मार्डी परिसरातील १४ गावांचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी शासनाच्या विरोधात आंदोलन करण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही. यासाठी मला तुमच्या साथीची व पाठबळाची गरज आहे.
दुष्काळी जनतेच्या हक्काच्या पाण्यासाठी लढलो. उरमोडीचे आलेले पाणी जपून वापरा, पावसाचे पडणारे पाणी आडवण्याची साधने निर्माण केली. जलयुक्त शिवार योजनेची प्रथम माणमध्ये आम्ही सुरुवात केली. ही योजना नंतर राज्याने स्वीकारली. साखळी बंधाऱ्यांचा पायलट प्रोजेक्ट, कोल्हापूर टाईप बंधारे या सर्व संकल्पना माण-खटावच्या मातीत पहिल्यांदा माझ्या प्रयत्नातून व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठबळाने सुरू करण्यात यशस्वी झालो. नंतर यासर्व संकल्पना राज्याने स्वीक
ारल्या. याचा अभिमान
आहे.’
चेतना सिन्हा म्हणाल्या, ‘मी जेव्हा पहिल्यांदा म्हसवडमध्ये आले तेव्हा येथील जनतेच्या पाणीप्रश्नासाठी आंदोलन करण्यासाठी आले. या आंदोलनानंतर अटकही झाली. परंतु पाणीप्रश्नासाठी या भागात आले व नंतर मी येथीलच झाले. दुष्काळी जनतेची दु:खे मी पाहिली असून, आपल्याला पाणीदार आमदार मिळाल्याने या भागात पाणी आले आहे. येथील ग्रामदैवत सिद्धनाथ मंदिरामध्ये नवरात्र उत्सवात नगरप्रदक्षिणा, गावप्रदक्षिणेसाठी हजारो भक्तगण जात असतात. तसेच आजवर कोरड्या नदीत येथील सुवासिनी दीपोत्सव साजरा करत. परंतु आता ते दिवस संपले असून, यापुढील काळात नदीतील पाण्यातच दीपोत्सव साजरा होणार आहे. हे आ. गोरे भाऊंमुळे शक्य होणार आहे.’ (प्रतिनिधी)


चांगल्या कामावर टिवटिव नको...
बंधारा कोणी आणला, पाणी कोणी आणले यासाठी मला कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही. हे सर्व कोणी आणले हे माझ्या स्वाभिमानी जनतेला माहीत आहे. त्यामुळे विरोधकांनी आपली टीव टीव बंद करावी. चांगले करता येत नसेल तर किमान झालेल्या समाजोपयोगी कामांवर तक्रारी तर करू नये, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

Web Title: Urmodi water till the end of the human body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.