उरमोडीचे पाणी शेवटपर्यंत पोहोचवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 11:01 PM2017-08-31T23:01:29+5:302017-08-31T23:01:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
दहिवडी : ‘उरमोडीचे पाणी रात्रंदिवस प्रयत्न करून मोठ्या परिश्रमाने माण तालुक्यात आणलयं. ज्यांना या मातीचे काही देणेघेणे नाही, अशा औलादी कितीही केकाटल्या तरी तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत उरमोडीचे पाणी पोहोचविण्याचा माझा संकल्प मी पूर्ण करणारच,’ असा विश्वास आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. सरकार कुणाचेही असले तरी जिहेकटापूर उपसासिंचन योजना पूर्ण करण्याचे मीशन आता हाती घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
धामणी येथे पहिल्यांदाच आलेल्या उरमोडीच्या पाण्याचे पूजन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी शिक्षण सभापती भास्करकाका गुंडगे, काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष एम. के. भोसले, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, दादासाहेब काळे, हरिभाऊ जगदाळे, माजी नगराध्यक्ष नितीन दोशी, बाळासाहेब माने, गुलाबराव खाडे, सरपंच सिंधूताई खाडे, दिगंबर राजगे, बाळासाहेब पिसे, अजित खाडे, सय्यद मुलाणी आणि परिसरातील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार गोरे पुढे म्हणाले, ‘आजपर्यंत माण तालुक्यातील अनेक पिढ्यांनी पाण्याची वाट पाहिली. गेल्या कित्येक वर्षांत जनतेने सक्षम लोकप्रतिनिधी न निवडल्याने आपल्या हक्काच्या पाण्यापासून आपण वंचित राहिलो. अगोदरच्या लोकप्रतिनिधींनी फक्त लाचारी करून स्वत:चा स्वार्थ साधला. माणमधे पाणी आणण्यासाठी लागणारे प्रयत्न केले नाहीत. मी राजकारणात येताना माण तालुक्यात पाणी आणण्याचे स्वप्न पाहिले. पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी बेभान होऊन रात्रंदिवस परिश्रम केले. दिलेल्या शब्दाप्रमाणे मी मतदारसंघात अनेक वेळा उरमोडीचे पाणी आणले.’
विरोधकांनी प्रत्येक वेळी केकाटायचे काम केले. आत्ताही १६ दिवस माणमधे पाणी सुरू आहे. मात्र, एकाचेही या पाण्याकडे बघण्याचे धाडस झाले नाही. त्यांच्याकडे तशी नैतिकताच नाही. जनतेच्या आशीवार्दाने मी आपल्या हक्काचे पाणी यापुढेही कायम आणणार आहे. आलेल्या पाण्याला कोणता पक्ष किंवा पार्टी नाही. हे पाणी आपल्या सर्वांचे भले करणार आहे. उगाच या पाण्याला आणि इथल्या मातीला बदनाम करण्याचे उद्योग विरोधकांनी प्रयत्न करू नयेत. पाणी मीच आणलेय, आता बारसे घालायला कुणीही आले तरी फरक पडणार नाही. पाणी आणण्यासाठी युती सरकारशी संघर्ष करून त्यांना अनेक निर्णय घ्यायला भाग पाडले आहे. आता उरमोडीचे पाणी दिवड, गट्टेवाडी, ढाकणी तलाव, वडजल भागात नेणार आहे. पुढच्या वर्षी जांभुळणीला जाणार आहे,’ असेही गोरे यावेळी म्हणाले.
शासनाला दुष्काळावर खर्च करण्यापेक्षा पाणीयोजना चालविण्यासाठी खर्च करण्यासाठी गळ घालणार आहे. जिहेकटापूरसाठीही जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही योजनांचे पाणी यायला लागल्यावर माण तालुक्यातही साखर कारखाने उभे राहतील. कार्यक्रमात एम. के. भोसले, दिगंबर राजगे, सयाजी लोखंडे यांनी मनोगत व्यक्त केले.