वाईजवळ ब्रिटीश कालीन झाडांच्या बुंध्यावर रासायनिक पदार्थांचा प्रयोग
By admin | Published: April 11, 2017 12:45 PM2017-04-11T12:45:16+5:302017-04-11T12:45:16+5:30
पर्यावरणावर घाला : सुरूरजवळ आठ वृक्षांच्या बुंध्यांना आग
आॅनलाईन लोकमत
वाई : वाई-सुरूर रस्त्यावर दुतर्फा असणाऱ्या ब्रिटीशकालीन झाडांच्या बुंध्यात ज्वालाग्राही रसायनांच्या मदतीने आग लावण्याचे प्रकार समाजकंटकांकडून घडत आहेत. उन्हाळ्याची तीव्रता प्रचंड वाढल्याने ओल्या झाडांनाही त्वरित आग लागत आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींमधून संतापाची लाट उसळली आहे.
सुरूर रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ वडाच्या सात ते आठ मोठ्या झाडांच्या बुंद्यांना आग लावण्यात आली होती. वाईतील पर्यावरण प्रेमींनी झाडाच्या बुंध्यात लागलेली आग विझवून झाडाला जीवदान दिले आहे. त्यावेळी संबंधित विभागाने संबंधित समाज कंटाकांना शोधून कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
सद्या झाडे तोडण्याचे प्रमाण प्रचंड वाढल्याने जंगल संपत्ती नष्ट होत आहे. दिवसेंदिवस सूर्य आग ओकत असल्याने तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. तरीही संबंधित विभागाकडून यावर कोणताही उपाय करण्यात आला नाही. त्यामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत असून त्याचा परिणाम पर्जन्यमान व जीवसृष्टीवर होत आहे. झाडे नष्ट होण्याचे प्रमाण वाढल्याने निसर्ग कोपला असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. निसर्ग संपत्ती नाहीशी झाल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होऊन जमिनीची धूप वाढत आहे. मानवाचे निसर्गावर होणारे आक्रमण वाढत चालल्याने दुष्काळासारख्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. या वर्षी सध्या संपूर्ण महाराष्ट्राला अनेक ठिकाणी पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
वेळीच समाज प्रबोधन झाले नाही तर हे दुदैर्वी प्रकार दिवसेंदिवस वाढतच राहणार आहेत. वन विभाग व बांधकाम विभागांनी एकत्रितपणे कारवाई करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. समाजातील काही घटकांनी, पर्यावरण प्रेमींनी या विभागाला सहकार्य केल्यास हे प्रकार त्वरित थांबू शकतात. ओल्या झाडाला आग लावून नष्ट करण्याचा हा प्रकार दुदैर्वी असून तो थांबण्यासाठी सर्वांनी एकत्रीतपणे पुढे येण्याची गरज आहे. तसेच बांधकाम विभागाने रस्ते रुंदीकरणात झाडे हटविण्यापेक्षा ती स्थलांतरित करून नव्याने लावण्याचा प्रयत्न केल्यास त्यातून समाजाला एक दिशा मिळून अशा प्रकारांना आळा बसण्यासाठी मदत मिळेल. (प्रतिनिधी)
कावळ्यांचा हकनाक बळी
समाजकंटकांनी लावलेल्या आगीत या झाडांवरील कावळ्यांचे अनेक घरटी जळाली. यामध्ये एका कावळळ्याचा हकनाक बळी गेला.