निधीचा विनियोग गावाच्या विकासासाठी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:41 AM2021-07-30T04:41:17+5:302021-07-30T04:41:17+5:30
सातारा : प्रत्येक गावाची प्रगती करायची असेल तर गावामध्ये विविध प्रकारची विकासकामे मार्गी लागणे आवश्यक आहे. कास पठार कार्यकारी ...
सातारा : प्रत्येक गावाची प्रगती करायची असेल तर गावामध्ये विविध प्रकारची विकासकामे मार्गी लागणे आवश्यक आहे. कास पठार कार्यकारी समितीने कास पठार प्रवेश शुल्कामधील राखीव निधी त्या भागातील गावांच्या विकासासाठी दिला ही बाब कौतुकास्पद आहे. या मिळालेल्या निधीचा विनियोग गावाच्या विकासासाठी करून चांगली विकासकामे मार्गी लावा, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
कास पठार कार्यकारी समितीकडून पठारावर येणाऱ्या पर्यटकांकडून प्रवेश शुल्क घेण्यात येते. या जमा झालेल्या रकमेतून राखीव निधी परिसरातील गावांच्या विकासासाठी खर्ची घालण्याचा निर्णय आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी समितीमार्फत घेण्यात आला. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल ६० लाख रुपये निधी ६ गावांना देण्यात आला. कास गावासाठी २० लाख, एकिवसाठी ११ लाख, अटाळीसाठी ९ लाख ५० हजार, कासाणी ९ लाख ५० हजार, कुसुंबी ५ लाख आणि पाटेघर गावाला ५ लाखांचा निधी देण्यात आला असून, वन भवन येथे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते निधीच्या धनादेशाचे वाटप सरपंच आणि सदस्यांना करण्यात आले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, ज्ञानदेव रांजणे, सहाय्यक वनसंरक्षक सचिन डोंबाळे, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, समितीचे अध्यक्ष बजरंग कदम, बलभीम शिंगरे, सोमनाथ जाधव, विष्णू किर्दत, गोविंद बादापुरे, मारुती चिकणे आदी उपस्थित होते. गावांच्या विकासासाठी निधी देणारी कास पठार कार्यकारी समिती ही एकमेव समिती आहे. समितीचे काम चांगले असून, हा आदर्श इतर कमिट्या आणि समित्यांनी घेतला पाहिजे. या मिळालेल्या निधीतून ग्रामस्थांना अपेक्षित अशी विकासकामे करून गावाचा कायापालट करा, अशा सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित सरपंच आणि पदाधिकाऱ्यांना केल्या.
फोटो : २९ सुरुची