शासकीय इमारती वापराविना..
By Admin | Published: September 7, 2015 08:56 PM2015-09-07T20:56:43+5:302015-09-07T20:56:43+5:30
माण तालुका : दहिवडी येथील प्रकार; परिसरात गवत, घाणीचे साम्राज्य
नवनाथ जगदाळे - दहिवडी येथील पोलीस ठाणे व माण तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या दहिवडी बांधकाम विभागाच्या इमारती वापराविना अनेक दिवस पडून आहेत. या ठिकाणी गवत आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
माण तालुक्याचे ठिकाण म्हणून दहिवडी ओळखले जाते. या ठिकाणी सर्वच शासकीय कार्यालये आहेत. मुख्य अधिकाऱ्यांची निवासस्थाने सोडल्यास शासकीय कर्मचाऱ्यांना निवासस्थाने नाहीत. त्यामुळे अनेक अधिकारी बाहेरून जाऊन येऊन करीत असतात. बांधकाम विभगाच्या अधिकाऱ्यांचेही नेमके तसेच आहे. मात्र, या ठिकाणी शासनाने लाखो रुपये खर्चून बांधलेल्या इमारतीचे करायचे तरी काय? असा प्रश्न पडतो. या ठिकाणी गवत अािण प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले आहे. २४ तास ड्यूटी करणाऱ्या पोलिसांना निवासाची सोय नाही, जेमतेम पाच कुटुंबे राहतील एवढीच सोय आहे. जवळपास ४० कर्मचारी असे असताना बांधकाम खाते मात्र सुस्त आहे. त्यांना या इमारतीत राहायचे नसतील, तर त्या इतर खात्याकडे वर्ग कराव्यात, अशीही मागणी अनेक शासकीय नोकर करताना दिसतात.काही दिवस या ठिकाणी तहसील विभागाचे लोक राहत होते. अलीकडे इमारतीची बिकट स्थिती झाली आहे, त्यामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात चालले आहेत.
येथील इमारती लोड बेरिंगच्या आहेत. जुन्या असल्याने दुरूस्त करण्याचा प्रस्ताव दिला आहे. अद्याप त्याला अनुदान मिळालेले नाही. पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने गेली पाच वर्षे तेथे कोणीही राहत नाही. मी या ठिकाणी नवीनच आलो आहे. सविस्तर माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल.
- एच. के. शिंगटे, उपअभियंता, बांधकाम विभाग दहिवडी