प्लास्टिक पिशवी वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:23 AM2021-03-30T04:23:10+5:302021-03-30T04:23:10+5:30

पाटण : शहरात ५० मायक्राॅनपेक्षा कमी जाडी असलेल्या प्लास्टिक पिशवी वापरण्यावर पालिकेने बंदी घातली असूनही सर्रासपणे अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांकडून ...

Use plastic bag | प्लास्टिक पिशवी वापर

प्लास्टिक पिशवी वापर

googlenewsNext

पाटण : शहरात ५० मायक्राॅनपेक्षा कमी जाडी असलेल्या प्लास्टिक पिशवी वापरण्यावर पालिकेने बंदी घातली असूनही सर्रासपणे अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांकडून या पिशव्यांचा वापर केला जात आहे. प्लास्टिक पिशवी वापरणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे.

पाणीपातळीत घट

वडूज : वाढलेल्या उन्हामुळे तालुका व परिसरातील गावांमध्ये असलेल्या विहिरी, तलाव व ओढ्यांतील पाण्याची पातळी घटलेली आहे. पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने या भागातील लोकांना पाण्याचा काटकसरपूर्वक वापर केला जात आहे.

रस्त्याला खड्ड्यांचे ग्रहण

कऱ्हाड : कऱ्हाड एसटी स्टॅण्ड, भेदा चौक मार्गे कोल्हापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. वाहनचालकांना याचा नाहक त्रास होत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्यांकडे पालिकेने तत्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

उन्हाचा तडाखा वाढला

फलटण : उन्हाळा ऋतूला सुरुवात झाली असल्याने वातावरणात उन्हाचा तडाखा वाढत आहे. शहरात ठिकठिकाणी रस्त्याकडेला थंडगार लिंबू सरबत, कोकम सरबत तसेच उसाच्या रसाची मागणी वाढली आहे. उन्हापासून थंडावा मिळावा म्हणून नागरिक सरबत पित आहेत.

आवक वाढली

सातारा : उन्हाळ्यामुळे शरीराला पाण्याची मोठी गरज लागत आहे. कलिंगडसारख्या फळामुळे पाण्याची कमतरता भरून निघते. नेमकी याच काळात कलिंगडांची आवक वाढलेली असून हे फळ खरेदीसाठी जागोजागी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. कोरेगाव परिसरात रस्त्याच्या दुतर्फा कलिंगड विक्री सुरू असते.

रस्त्याकडेला कचरा

सातारा : शहरातील शहर पोलीस स्टेशन मार्गावरील मुख्य रस्त्याकडेला असणारे नाले कचऱ्यामुळे तुडुंब भरत आहेत. पावसाच्या पाण्यामुळे नाल्यातील कचरा रस्त्यावर पडत असतो. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून वाहनधारकांना व नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.

साइडपट्ट्या खचल्या

मेढा : मेढा-महाबळेश्वर रस्त्यावरील साइडपट्ट्या खचल्या आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. विशेषत: रात्री या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते.

मोकाट जनावरांचा त्रास

सातारा : साताऱ्यात मोकाट जनावरांच्या झुंडीच्या झुंडी फिरत असून अनेकदा ही जनावरे रस्त्यावरच ठाण मांडून बसत आहेत. नागरिकांबरोबरच वाहनधारकांनाही याचा नाहक त्रास होत आहे. या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

कलिंगडाला मागणी

कोरेगाव : उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस अधिकच वाढत असल्याने शीतपेयांबरोबर गारवा देणारी कलिंगड व टरबुजे विक्रीसाठी कोंडवे परिसरात दाखल झाली आहेत. रस्त्याशेजारी उभे राहून ग्राहक याचा आस्वाद घेताना दिसत आहेत. यात ज्येष्ठांसह चिमुकल्यांचाही सहभाग मोठा असल्याचे दिसत आहे.

चिलटांचा त्रास

सातारा : चैत्र पाडव्यापासून सूर्याचा पारा वाढला असल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना आता चिलटांनीही पिडून काढले आहे. कोणत्याही महत्त्वाच्या कामात असले तरी एका हाताने चिलटे हाकलण्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. नागरिकांनी यासाठी विविध घरगुती उपायांचा आसराही घेतला आहे, पण त्याचा उपयोग होताना दिसत नाही.

प्रेमीयुगुलांचे चाळे

पेट्री : कास परिसरात प्रेमीयुगुलांची लूट होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आता प्रेमीयुगुलांनी कण्हेर धरण परिसराचा आसरा घेतला आहे. त्यांच्या चाळ्यांमुळे स्थानिक त्रस्त झाले आहेत. सकाळी सातपासून युगुलांची सुरू होणारी वर्दळ संध्याकाळपर्यंत असते. पोलिसांनी फिरते पथक नेमावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

उड्डाणपुलाखाली कचरा

सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाखाली असणाऱ्या भुयारी मार्गात सध्या कचरा डेपो झाला आहे. उड्डाणपुलाखाली कचऱ्याचा ढीग तसाच साठून राहत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. ही स्वच्छता कोणत्या विभागाने करायची, असा प्रश्न शासकीय विभागांपुढे आहे.

झेब्रा क्रॉसिंग गरजेचे

उंब्रज : पुणे-बंगळुरू राज्यमार्ग क्रमांक ४ वरील उंब्रज येथे नागरिकांना ये-जा करण्यासाठी पुलाच्या खालून जो मार्ग आहे तसेच महामार्गावर येणाऱ्या व शहरात जाणाऱ्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तेथे झेब्रा क्रॉसिंगचे चिन्ह व स्पीड ब्रेकरची तातडीने व्यवस्था करावी, अशी मागणी उंब्रजकरांची आहे.

बाजारात माठाला मागणी

पाटण : उन्हाची तीव्रता वाढल्याने बाजारात मातीचे माठ विक्रीसाठी दाखल झाले आहेत. त्याला चांगली मागणी वाढली आहे. दीडशे ते दोनशे रुपये दराने या माठांची विक्री केली जात आहे. भाजी मंडई परिसर तसेच नगरपालिकेसमोर हे माठ कुंभार समाजातील विक्रेत्यांनी विक्रीसाठी ठेवलेले आहेत.

पिकअप शेडकडे दुर्लक्ष

कऱ्हाड : तालुक्यातील अनेक गावांच्या रस्त्याकडेला असलेले पिकअप शेड मोडकळीस आले आहेत. या पिकअप शेडची दुरवस्था झाली आहे. पिकअप शेडची डागडुजी एस. टी. मंडळ प्रशासनाने तत्काळ करावी, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांतून होत आहे.

Web Title: Use plastic bag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.