कोरोना वाढताच सॅनिटायझरचा वापर वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:39 AM2021-04-24T04:39:59+5:302021-04-24T04:39:59+5:30
सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने सातारकर सतर्क झाले असून, जो-तो आरोग्याची पुरेपूर काळजी घेऊ लागला आहे. कोरोनामुळे पुन्हा ...
सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने सातारकर सतर्क झाले असून, जो-तो आरोग्याची पुरेपूर काळजी घेऊ लागला आहे. कोरोनामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यात सॅनिटायझर, मास्क तसेच हॅण्डवॉशला मागणी वाढली असून, नागरिक याचा नित्यनेमाने वापरही करू लागले आहेत.
सातारा जिल्ह्यात २२ मार्च २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. यानंतर कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढत गेली. जुलै, ऑगस्ट महिन्यात तर कोरोनाने अक्षरश: हाहाकार माजविला. या कालावधीत नागरिकांकडून मास्क व सॅनिटायझरचा नियमित वापर केला जाऊ लागला. प्रत्येक घरात तसेच सर्व खासगी व शासकीय कार्यालय, दुकाने सर्वत्र सॅनिटायझर व मास्कचीच चलती होती. मात्र डिसेंबरनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला अन् सॅनिटायझर, मास्कच्या मागणीतही घट झाली.
दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. दररोज एक ते दीड हजार रुग्ण आढळून येऊ लागल्याने नागरिकांनी भलतीच धास्ती घेतली आहे. त्यामुळे जो-तो स्वत:च्या व कुटुंबाच्या सुरक्षेची काळजी घेऊ लागला असून, पुन्हा एकदा मास्क, सॅनिटायझर, विविध प्रकारचे हॅण्डवॉश, साबण अशा वस्तूंच्या मागणीत वाढ झाली आहे.
(पॉइंटर)
- गतवर्षी सॅनिटायझरची मागणी ६७ टक्के घटली होती.
- आता मागणी वाढली असून, ती ९० टक्क्यांवर गेली आहे.
- सॅनिटायझरचे दर अधिक असल्याने बहुतांश नागरिक साबण व हॅण्डवॉशचा वापर करू लागले आहेत.
- यंदा मास्कलादेखील मागणी वाढली आहे.
(चौकट)
सुरक्षा महत्त्वाचीच : डॉ. योगीता शहा
नागरिकांनी स्वत:सह कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी बाजारपेठेत अथवा बाहेरून आल्यानंतर सॅनिटायझरचा वापर करावा. साबणाने हात स्वच्छ धुुवावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. मास्कचा नियमित वापर करावा. ताप, थंडी, खोकला, अंगदुखी अशी दुखणी अंगावर न काढता तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. कोरोना रोखण्याची जबाबदारी एकट्या प्रशासनाची नव्हे तर आपणा सर्वांची आहे.
फोटो : सॅनिटायझरचा फोटो