वर्गणीचा वापर सुकेशनीच्या शस्त्रक्रियेसाठी...
By admin | Published: September 13, 2016 12:20 AM2016-09-13T00:20:00+5:302016-09-13T00:46:58+5:30
मिळालं जगण्याचं बळ : पाचवड येथील ‘शिवसह्याद्री’ गणेश मंडळाने जोपासली अनोखी सामाजिक बांधिलकी
पाचवड : ‘दवाखाना कधीच मागे लागू नये,’ असे म्हणतात. पाचवडमधील सुकेशनी ननावरे हिच्या बाबतीतही तेच घडले. छातीतील गाठीकडे वेळीच योग्य इलाज न झाल्याने शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नव्हता. आर्थिक परिस्थितीमुळे खर्च झेपणारा नव्हता. शिवसह्याद्री गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी धावून आले अन् खर्चातील वाटा उचलून शस्त्रक्रिया करवून घेतली. त्यामुळे सुकेशनीला जगण्याचं बळं मिळालं.
सुकेशनी हिच्या छातीतील एक गाठ गंभीर स्वरुप धारण करत होती. हृदयापर्यंतच्या अवयवांना या गाठीने असह्य वेदना होऊ लागल्या. पाचवड येथील काही दवाखान्यांमध्ये तात्पुरते उपचार सुरू केले. परंतु गाठीचे योग्य निदान न झाल्याने होणाऱ्या उपचाराचा उलट परिणाम तिच्या शरीरावर होऊ लागला.
स्थानिक डॉक्टरांनीही कालांतराने हात झटकले व तिचा उपचार सातारा, पुणेसारख्या शहरांतील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला.
ननावरे कुटुंबाची ही परवड त्याठिकाणी असलेल्या ‘शिवसह्याद्री’ गणेश मंडळातील काही सदस्यांना कळाली. त्यानंतर मंडळाचे अध्यक्ष संतोष गायकवाड यांनी ननावरे कुटुंबीयांना भेटून सर्व परिस्थितीची माहिती घेतली. मंडळाच्या सर्व सदस्यांपुढे लहानाची मोठी झालेली सुकेशनी मृत्यूच्या दाढेत आहे. त्यातून तिची सुटका करायचीच, हा निर्धार मंडळाच्या बैठकीत सर्व सदस्यांनी घेतला. तिच्या उपचाराकरिता होणाऱ्या खर्चातील महत्त्वाचा वाटा मंडळातर्फे उचलण्यात आला. सुकेशनीला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्याचा श्रीगणेशा झाला. प्रथम मंडळातर्फे पाचवडमध्येच नव्याने सुरू झालेल्या मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये तिचा आजार व शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या खर्चासंबंधी चर्चा केली. एका मंडळाने सुकेशनीला जीवदान देण्याचे उचलल्याचे शिवधनुष्य पाहून त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनीही जेमतेम खर्चात सर्वोत्तम उपचार करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे सुकेशनीला त्यांच्या रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल केले. दोन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर सुकेशनीची त्या जीवघेण्या गाठीमधून मुक्तता झाली, तिला नवे आयुष्य मिळाले.
सुकेशनीला मृत्यूशी दोन हात करण्यासाठी तिचे मनोबल वाढवण्यात ‘शिवसह्याद्री’चे सदस्य भरत शर्मा, मारुती गायकवाड, अनिल गायकवाड, प्रणव मोरे, अजित धोत्रे, मारुती भिंगारे, किशोर मोरे, सचिन मोरे, मनोज मोरे, शंकर नलवडे, किरण बारटक्के, कालिचरण धोत्रे, बाळू कांबळे, अमित गुरव यांचा मोलाचा वाटा आहे. (वार्ताहर)
वाई : येथील नवप्रकाश गणेश मंडळाने सजावटीच्या अनाठायी खर्चाला फाटा देऊन ११,१११ रुपयांची मदत नगरपालिकेच्या शाळा क्ऱ पाचला दिली आहे़ नगराध्यक्षा सीमा नायकवडी यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी अध्यक्ष दिलीप शिवदे, काशीनाथ शेलार, दीपक ओसवाल, विनोद सकुंडे, सुनील गोळे, भैय्या संकुडे, प्रशांत चिटणीस, अनिल गोळे, अनिल चव्हाण, अतुल भाटे, आशिष पाटणे, संतोष चव्हाण, सुनील सोडमिसे, राहुल नायकवडी, मकरंद सकुंडे, रामदास सुतार उपस्थित होते़
नवीन जीवन : सुकेशनी
‘शिवसह्याद्री मंडळाने किती आर्थिक मदत केली हे माझ्यासाठी महत्त्वाचे नसून मला व माझ्या कुटुंबीयांना अशा बिकट परिस्थितीत दिलेली साथ व आधार फार मोलाचा आहे. अशाप्रकारचे कार्य इतरही गणेश मंडळांनी करणे गरजेचे आहे. माझी यशस्वी शस्त्रक्रिया करून मला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणाऱ्या डॉक्टर आणि मंडळाने मला नवीन जीवन दिले आहे,’ अशा भावना सुकेशनी ननावरे हिने व्यक्त केल्या.