नव्या तंत्रज्ञानावर आधारित अवजारांचा वापर करावा : चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:26 AM2021-06-26T04:26:35+5:302021-06-26T04:26:35+5:30

फलटण : ‘बीज प्रक्रिया, पेरणी प्रात्यक्षिक, बांधावर खतांची उपलब्धता यामधून कृषी खात्याने खरीप हंगाम पूर्व तयारीला सुरुवात केली आहे. ...

Use tools based on new technology: Chavan | नव्या तंत्रज्ञानावर आधारित अवजारांचा वापर करावा : चव्हाण

नव्या तंत्रज्ञानावर आधारित अवजारांचा वापर करावा : चव्हाण

Next

फलटण : ‘बीज प्रक्रिया, पेरणी प्रात्यक्षिक, बांधावर खतांची उपलब्धता यामधून कृषी खात्याने खरीप हंगाम पूर्व तयारीला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आणि या तंत्रज्ञानावर आधारित अवजारांचा वापर कृषी खात्याच्या मार्गदर्शनानुसार करावा,’ असे आवाहन आमदार दीपक चव्हाण यांनी केले.

राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने ‘कृषी संजीवनी’ योजनेंतर्गत आगामी खरीप हंगामाचे पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांविषयी माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या योजनेचा प्रारंभ फलटण तालुक्यातील रावडी येथे आमदार दीपक चव्हाण, सत्यजितराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. या वेळी फलटण बाजार समितीचे उपसभापती भगवानराव होळकर, आत्मा संचालक विनायक राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी भास्करराव कोळेकर, प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग, सरपंच जगन्नाथ सुळ, उपसरपंच अनिल बोबडे, रामभाऊ कदम, बापूराव कर्वे, सतीश साडगे, सुरेश काकडे उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, ‘फलटण तालुक्यात ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये परतीच्या माॅन्सूनचा पाऊस होतो. फलटण रब्बीचा तालुका समजण्यात येत असला तरी अलीकडे गेल्या काही वर्षात निसर्ग चक्र पूर्णतः बदलून गेल्याने ऋतुचक्रही बदलले आहे. परिणामी खरीप व रब्बी हंगामही बदलल्याचे नमूद करीत बदलत्या परिस्थितीत शेतकरीवर्ग पाण्याची उपलब्धता पाहून पिके करीत आहेत.’

सत्यजितराजे म्हणाले, ‘शेतीतून अधिक आर्थिक लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात केलेल्या सर्व पिकांचे एकरी उत्पादन वाढीला प्राधान्य देऊन शेती केल्याशिवाय शेती फायदेशीर होणार नाही. त्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी कोणत्याही हंगामात किंवा बिगर हंगामात पिके घेताना एकरी खर्च कमी कसा होईल आणि तरीही एकरी अधिक उत्पादन कसे घेता येईल याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवड करण्यात आली असून, काही फळांवर असलेली रोगराई सोडता बहुतांश शेतकऱ्यांना फळबागातून चांगले उत्पादन होत असले तरी मागणी नसल्याने या फळांतून फारसा समाधानकारक आर्थिक लाभ होत नसल्याने फळ प्रक्रिया उद्योगांची उभारणी केल्यास शेतकऱ्यांना समाधानकारक पैसा आणि बेरोजगार तरुणांना उद्योजक किंवा औद्योगिक क्षेत्रात वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करण्याची संधी निश्चित मिळेल.’

या वेळी उपविभागीय कृषी अधिकारी भास्करराव कोळेकर, प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

Web Title: Use tools based on new technology: Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.