‘व्हॅली क्रॉसिंग’चा प्रयोग फसला!
By admin | Published: January 29, 2015 09:35 PM2015-01-29T21:35:30+5:302015-01-29T23:38:33+5:30
महाबळेश्वरात वन अधिकाऱ्यांकडे तक्रार : शासकीय अध्यादेशानुसार व्यावसायिक तत्त्वावर परवानगी नसल्याचा दावा
सातारा : ‘व्हॅली क्रॉसिंग’ या साहसी खेळाचा प्रारंभ महाबळेश्वरमध्ये करण्यात आला खरा; परंतु यासंदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतर तो तातडीने बंदही करण्यात आला. असा प्रकल्प वनविभागाच्या हद्दीत व्यावसायिक तत्त्वावर राबविता येणार नाही, असा सरकारी आदेश असल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.यासंदर्भात माहिती अशी, महाबळेश्वरच्या केट््स पॉइंटजवळ दोराच्या साह्याने दरी ओलांडण्याचा (व्हॅली क्रॉसिंग) साहसी खेळ सुरू करण्यासंदर्भात वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. अवखळी गावच्या संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या वतीने हे निवेदन देण्यात आल्यावर नियमांना बगल देऊन केवळ तोंडी परवानगीनुसार हा खेळ तातडीने सुरू केल्याचा दावा पाचगणी येथील (सध्या रा. वाई) तक्रारदार शेख फरहा फझलकरीम पटाईत यांनी केला होता. महाबळेश्वर-पाचगणी हा ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ आहे.
१९८० च्या वन कायद्यानुसार वनखात्याची जागा अशा खेळांना देता येत नाही. तसेच, १९९७ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वनक्षेत्रात कोणत्याही प्रकल्पाला परवानगी देण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारला आहे. २००५ मध्ये राज्य शासनाने अध्यादेश काढून साहसी खेळांना वनक्षेत्रात व्यावसायिक तत्त्वावर परवानगी देता येणार नाही, असे म्हटले होते. या सर्व नियमांचा दाखला पटाईत यांनी तक्रार अर्जात दिला होता. जेथे हा साहसी खेळ सुरू केला होता, तेथे वन्यजीवांचा वावर आहे. तेथे मानवी जीविताला अनेक प्रकारे धोका पोहोचू शकतो, असे पटाईत यांनी सांगितले. त्यांनी वरिष्ठ वन अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात लेखी तक्रार दाखल केली आहे. (प्रतिनिधी)
तक्रारीनंतर ‘साहसा’ला स्वल्पविरामतक्रारीनंतर ‘साहसा’ला स्वल्पविराम
तक्रार दाखल केल्यानंतर ‘व्हॅली क्रॉसिंग’चा साहसी खेळ तूर्तास बंद करण्यात आला आहे, असे वन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ‘खरे तर प्रशिक्षित साहसपटूंमार्फत या ठिकाणी साहसी खेळांचे प्रशिक्षण देता येणे शक्य आहे; तथापि तक्रार दाखल झाल्यानंतर या बाबतीत कायदेशीर बाबी तपासल्या जात आहेत. ‘व्हॅली क्रॉसिंग’संदर्भात रीतसर प्रस्ताव तयार करून नव्याने परवानगी घेण्यात येईल,’ असे वन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.