शहरातील पडीक जागांचा वापर वाहनतळासाठी..
By Admin | Published: February 13, 2015 08:59 PM2015-02-13T20:59:15+5:302015-02-13T23:01:13+5:30
शिवेंद्रसिंहराजे : पालिका प्रशासनाला दिल्या सूचना
सातारा : दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत वाढ होत असल्याने सातारकरांना वाहतूक कोंडीच्या समस्याला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे शहरातील पडीक शासकीय जागेमध्ये पार्किंग झोन तयार करून वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावा,’ अशा सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नगरपालिका प्रशासनाला केल्या आहेत.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, पोवई नाका ते मध्यवर्ती बसस्थानक या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून, या रस्त्याच्या कडेला असणारी अतिक्रमणे प्रशासनाने दूर केली आहेत. मात्र, याठिकाणी पार्किंगची पुरेशी व्यवस्था नसल्याने वाहतूक कोंडी होत आहे. ‘पोवई नाका ते मध्यवर्ती बसस्थानक या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू असून, त्याठिकाणी पार्किंगची सोय नसल्याने वाहतूक कोंडी होत आहे. या ठिकाणासह शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी ठिकठिकाणी वाहनतळ असणे आवश्यक आहे. बसस्थानकासमोर महसूल भवन असून, त्याठिकाणच्या मोकळ्या जागेत वाहनतळ विकसित केल्यास या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होईल. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी या जागा पार्किंग झोन म्हणून विकसित करण्यासाठी सहकार्य करावे,’ अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे. नगरपालिका कार्यालयासमोर असलेल्या शासकीय जागेचा वापरही पार्किंग झोन म्हणून करावा. यासाठी पालिकेने जिल्हा प्रशासनाकडून परवानगी घेऊन या जागा वाहनतळ म्हणून विकसित करावी, अशी सूचना शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांना केली आहे. (प्रतिनिधी)
तीन रस्ते मोकळे व्हावेत
सातारा शहरात राजपथ, कर्मवीर भाऊराव पाटील पथ (खालचा रस्ता) आणि राधिका रोड हे तीन प्रमुख रस्ते आहेत. या तिन्ही रस्त्यांवर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. रस्त्याच्या कडेला वाहने लावल्याने अनेकदा या रस्त्यांवर वाहतूक ठप्प होत असते. वाहतूक सुरळीत होण्यासाठी वाहनांचे पार्किंग शिस्तबद्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे नगरपालिका आणि पोलीस दलाच्या वाहतूक नियंत्रण शाखेने समन्वयाने रस्त्याच्या कडेला होणारे वाहनांचे पार्किंग शिस्तबद्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही शिवेंद्रसिंहराजे यांनी केले आहे