‘कृष्णा’ची साधनसंपत्ती वापरून भोसलेंनी खासगी कारखाना काढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:26 AM2021-06-24T04:26:33+5:302021-06-24T04:26:33+5:30

कऱ्हाड : कृष्णा कारखान्याची साधनसंपत्ती वापरून डॉ. सुरेश भोसले यांनी जयवंत शुगर हा खासगी कारखाना उभारला. त्याचमार्गाने जाऊन डॉ. ...

Using Krishna's resources, Bhosale set up a private factory | ‘कृष्णा’ची साधनसंपत्ती वापरून भोसलेंनी खासगी कारखाना काढला

‘कृष्णा’ची साधनसंपत्ती वापरून भोसलेंनी खासगी कारखाना काढला

Next

कऱ्हाड : कृष्णा कारखान्याची साधनसंपत्ती वापरून डॉ. सुरेश भोसले यांनी जयवंत शुगर हा खासगी कारखाना उभारला. त्याचमार्गाने जाऊन डॉ. इंद्रजित मोहिते यांनाही कृष्णा कारखाना मोडीत काढून त्याला आपला खासगी कारखाना बनवायचा आहे. त्यासाठी लागणारा खासगी कारखाना उभारणीचा परवाना त्यांनी अगोदरच मिळवला असल्याचा खळबळजनक आरोप कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी केला.

गोवारे, करवडी, वारुंजी, नांदलापूर, भुरबुशी, येळगाव, येणपे, येवती, जिंती, घोगाव, टाळगाव (ता. कऱ्हाड) येथील संस्थापक पॅनलच्या प्रचारादरम्यान सभासद बैठकीत अविनाश मोहिते बोलत होते. यावेळी जयवंत पाटील, सुरेश पाटील, उमेश माने, ॲड. चंद्रकांत कदम, प्रकाश देशमुख, शिवाजी सावंत, शिवाजी पाटील, भारत पाटील, किशोर पाटील, प्रवीण पाटील, डॉ. रणजित पाटील, संभाजी पिसाळ, सागर जाधव, निवास पवार, सुशांत यादव उपस्थित होते.

मोहिते म्हणाले, दोन्ही डॉक्टर कारखान्याच्या मागे लागलेले राहू, केतू आहेत. भोसले यांनी कृष्णा उद्योग समूहातील सहकारी संस्था मोडीत काढून जयवंत शुगर ही आपली खासगी जहागिरी निर्माण केली. नामसदृश्य ट्रस्टची स्थापना करून ट्रस्ट तुमचाच असल्याचे सभासदांना भासवले. सभासदांच्या पैशातून निर्माण झालेला कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट पचवला. कारखान्याच्या सभासदांना अक्रियाशील बनवून, राजीनामे घेऊन कृष्णा कारखान्याला त्यांना जयवंत शुगरचे युनिट नंबर दोन बनवायचे आहे.

डॉ. इंद्रजित मोहिते यांचा प्रवासही त्याच मार्गाने सुरु आहे. डॉ. मोहिते यांनी कारखान्याच्या दीडशे एकर जमिनी आणि कृषी कॉलेज दिवंगत यशवंतराव मोहिते नावाने नोंदणी केलेल्या खासगी ट्रस्टच्या नावे केले होते. ते हडप करण्याचा डाव आपल्यामुळे फसला. डॉ. मोहिते यांना कृष्णा कारखान्याची जर काळजी आहे, सहकारी साखर कारखानदारी टिकावी, असे त्यांना वाटत असेल तर त्यांनी खासगी साखर कारखाना काढण्याचा परवाना कशासाठी घेतला आहे? याचा खुलासा त्यांनी ‘कृष्णा’च्या सभासदांसमोर करायला हवा, अशी मागणी केली.

Web Title: Using Krishna's resources, Bhosale set up a private factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.