सातारा हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धेत कोल्हापूरचा उत्तम पाटील प्रथम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 11:57 AM2024-09-02T11:57:59+5:302024-09-02T11:59:01+5:30
महिला गटात भंडाऱ्याच्या तेजस्विनी लांबकाने ठरली अव्वल
सातारा : सातारा रनर्स फाउंडेशनच्या वतीने रविवारी सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन’ स्पर्धेत कोल्हापूरच्या उत्तम पाटील (वय २४) याने २१ किलोमीटर अंतर १ तास १३ मिनिटे ३२ सेकंदांत पूर्ण करून पुरुष गटात प्रथम क्रमांक पटकविला; तर भंडाऱ्याच्या तेजस्विनी लांबकाने हिने १ तास २६ मिनिटे १८ सेकंदांत शर्यत पूर्ण करत महिला गटात अव्वल क्रमांक पटकविला.
सातारा रनर्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित जाणाऱ्या स्पर्धेचे हे १३ वे वर्ष आहे. या मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात पोलिस परेड ग्राउंड येथून सकाळी ६:३० वाजता झाली. खासदार उदयनराजे भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवला. यानंतर धावपटू मार्गस्थ झाले. देशभरातील सुमारे आठ हजार धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.
पोलिस परेड ग्राउंड येथून सुरू झालेली स्पर्धा पारंगे चौक, पोवई नाका, बोगदा, पॉवर हाऊस, यवतेश्वर घाटातून हॉटेल निवांत, प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट व त्याच मार्गाने पोलिस परेड ग्राउंड येथे समाप्त झाली. स्पर्धेनंतर आयोजित कार्यक्रमात विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
स्पर्धेतील विजेते
पुरुष गट :
प्रथम : उत्तम पाटील (कोल्हापूर)
द्वितीय : आनंद गावकर (बेळगाव)
तृतीय : प्रथमेश परामकर (बेळगाव)
महिला गट :
प्रथम : तेजस्विनी लांबकाने (भंडारा)
द्वितीय : साक्षी जडयाल (चिपळूण)
तृतीय : वैष्णवी मोरे (कऱ्हाड)
साताऱ्यात धावपटूंनी अनुभवला थरार, स्पर्धेत धावले आठ हजार धावपटू
सर्वदूर पसरलेली धुक्याची दुलई, हिरव्यागार वनराईने बहरलेल्या डोंगररांगा, यवतेश्वर घाटातील नागमोडी वळणे अन् जितकी रोमहर्षक तितकीच खडतर मानली जाणारी ‘सातारा हिल हाफ मॅरथॉन स्पर्धा’ साताऱ्यात मोठ्या उत्साहात पार पडली. देशभरातील आठ हजार धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून थरार अनुभवला.
२१ किलोमीटर अंतराच्या या स्पर्धा मार्गावर आठ ठिकाणी मदत केंद्रे उभारण्यात आली होती, तसेच ऑटोमटिक इलेक्ट्रिक डिफ्यब्युलेटरची (एईडी), कार्डियाक रुग्णवाहिकांचीदेखील व्यवस्था करण्यात आली होती. स्पर्धा पाहण्यासाठी सातारकरांनी मॅरेथाॅन मार्गावर गर्दी केली होती. आबालवृद्धांकडून टाळ्या वाजवून स्पर्धकांना प्रोस्ताहन देण्यात आले. निसर्गाशी एकरूप करणारा मॅरेथॉन स्पर्धेचा मार्ग जितका राेमहर्षक होता, तितकाच तो खडतरही होता. तरीदेखील हा रोमांचकारी थरार अनुभवत देशभरातील आठ हजार धावपटूंनी ही स्पर्धा पूर्ण केली. स्पर्धेच्या मार्गावर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
घोषणांनी संचारले चैतन्य
छत्रपती शिवाजी महाराज की जय, वंदे मातरम्, भारत माता की जय, अशा घोषणा देत तिरंगा ध्वज हातात घेऊन रनर्स धावत होते. धावताना स्पर्धकांमध्ये वेगळेच स्फुरण पाहावयास मिळाले. स्पर्धकांची केलेल्या आगळ्यावेगळ्या वेशभूषेमुळे यवतेश्वर घाट खुलून गेला. घाटातील निखळ झऱ्यातील पाणी तोंडावर मारून स्पर्धक पुढे जात होते. काही स्पर्धकांना घाटातील छोट्या धबधब्यासमवेत सेल्फीचा मोह आवरता आला नाही.
स्वयंसेवक, ग्रामस्थांची स्वच्छता मोहीम
धावपटूंसाठी पाणी, चिक्की, केळी आदींनी जागोजागी व्यवस्था करण्यात आली होती. रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेला कचरा संयोजकांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने गोळा करून परिसराची स्वच्छता केली. ढोल-ताशांचा गजर, देशभक्तीपर गीते धावपटूंना प्रोत्साहन देत होते. संगीत गाणे, बँजोपथकाकडून स्पर्धकांचे स्वागतही करण्यात आले.
अहं योद्धा स्मि थीम!
मी योद्धा आहे. जीवनात विविध अडचणी येत असतात. त्यांना सामोरे जात त्यावर मात करतो तोच विजयी होतो. या योद्धाला पाहून आपल्याला स्फुरण येते, असा संदेश या मॅरेथॉनच्या माध्यमातून देण्यात आला. मॅरेथॉन मार्गावर स्पर्धकांसाठी मदतकेंद्रे उभारण्यात आली होती. गीते बिल्डिंग, यादोगोपाळ पेठ, बोगदा, यवतेश्वर घाट, साईबाबा मंदिर, प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्टच्या अलीकडे तसेच अदालत वाडा येथे ही मतदकेंद्र उभारली होती.