पशुसंवर्धन कर्मचाऱ्यांना लसीकरण करा : जानकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:41 AM2021-05-27T04:41:36+5:302021-05-27T04:41:36+5:30
सातारा : पशुसंवर्धन विभागात काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी हे फ्रन्टलाईन वर्कर्स आहेत. राज्य शासनाने या कर्मचाऱ्यांना प्रथम प्राधान्य ...
सातारा : पशुसंवर्धन विभागात काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी हे फ्रन्टलाईन वर्कर्स आहेत. राज्य शासनाने या कर्मचाऱ्यांना प्रथम प्राधान्य देऊन लसीकरण करून घ्यावे, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
कोरोना साथीच्या काळामध्ये पशुसंवर्धन अधिकारी आणि कर्मचारी प्रत्येक गावात लोकांच्या गोठ्यात जाऊन त्यांच्या जनावरांवर उपचार करत आहेत. आपल्या जिवाची पर्वा न करता, शेतकऱ्यांना जनावरे वाचविण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. हे कर्तव्य पार पाडताना हे अधिकारी व कर्मचारी अनेक लोकांच्या संपर्कात येतात. यापैकी अनेक कर्मचारी, अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांनी कोरोनामुळे आपले प्राणही गमावले आहेत.
या परिस्थितीमध्ये पशुसंवर्धन विभागात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचे विमा कवच द्यावे. तसेच त्यांना फ्रन्टलाईन वर्कर घोषित करून लसीकरण आणि औषधोपचारामध्ये प्राधान्य द्यावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.