रक्तदात्यांना प्राधान्याने लस द्या : महामुलकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:31 AM2021-04-29T04:31:28+5:302021-04-29T04:31:28+5:30
सातारा : कोरोना महामारीच्या काळामध्ये लोकांचे जीव वाचवण्यासाठी असंख्य रक्तदाते सामाजिक भावनेने पुढे येत आहेत. लसीकरण करताना या रक्तदात्यांचा ...
सातारा : कोरोना महामारीच्या काळामध्ये लोकांचे जीव वाचवण्यासाठी असंख्य रक्तदाते सामाजिक भावनेने पुढे येत आहेत. लसीकरण करताना या रक्तदात्यांचा प्राधान्याने विचार शासनाने करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब महामुलकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
या महासंकटात सातारा जिल्ह्यात तसेच राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. अपुऱ्या रक्तामुळे अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागत असल्याचे आपण सर्वजण पाहत आहोत. समाजातील अनेक सामाजिक संस्था स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान शिबिरांचे आयोजन करीत आहेत. त्यामध्ये अनेक तरुण नागरिक रक्तदान करीत आहेत. शासनाने निर्णय घेतल्याप्रमाणे एक मेपासून १८ ते ४५ या वयोगटातील लोकांना लस दिली जाणार आहे. या वयोगटातील लोकसंख्या जास्त असल्याने लसीकरणासाठी जास्तीची गर्दी होऊ शकते. म्हणून या लसीकरणामध्ये ज्या युवकांनी, नागरिकांनी गेल्या तीन महिन्यांमध्ये रक्तदान केले आहे, त्या रक्तदात्यांना ऑनलाईन प्रतीक्षा यादीमध्ये न ठेवता प्राधान्याने त्यांना लस देण्यात यावी. यामुळे रक्तदात्यांना सुद्धा प्रोत्साहन मिळेल आणि ज्यांनी रक्तदान केले आहे, त्यांचा सुद्धा योग्य असा सन्मान होईल. तरी या गोष्टीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून रक्तदात्यांना सर्वप्रथम लसीकरण करावे, असे या निवेदनात म्हटले आहे.