खटावमध्ये १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:33 AM2021-05-03T04:33:07+5:302021-05-03T04:33:07+5:30
खटाव : कोरोनाच्या लसीच्या दुसऱ्या टप्प्यादरम्यान १८ वर्षांवरील सर्वांना १ मेपासून लस देण्यास सुरुवात झाली आहे. खटावमधील प्राथमिक आरोग्य ...
खटाव : कोरोनाच्या लसीच्या दुसऱ्या टप्प्यादरम्यान १८ वर्षांवरील सर्वांना १ मेपासून लस देण्यास सुरुवात झाली आहे. खटावमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात या तिसऱ्या टप्प्यातील या लसीकरणाची सुरुवात झाली.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप विधाते, गटविकास अधिकारी काळे, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील, सरपंच नंदकुमार वायदंडे, संदीप मांडवे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.युनूस शेख, उपसरपंच अमर देशमुख, अशोक कुदळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.पराग रणदिवे, डॉ.निखिल लोंढे यांची प्रमुख उपस्थितीत प्रतिनिधिक रूपात पहिल्या १८ वर्षांवरील लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
लसीसंदर्भात मात्र संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे सुरुवातीला काही वेळ लसीकरण केंद्राबाहेर गर्दी तसेच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. केंद्र सरकारने तिसऱ्या टप्प्यासाठी नवीन धोरण तयार केले असल्यामुळे, १८ ते ४५ वर्षे वयोगटांतील तरुणांना नोंदणी न करता ही लस दिली जाणार नाही. नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आल्यामुळे बऱ्याच लोकांनी २८ तारखेला नोंदणी केले आहे, परंतु त्यांची लस नसल्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली होती, तर केवळ २०० लोकांची लस आल्यामुळे, तसेच वरूनच नोंदणीत २०० लोकांची यादी आल्यामुळे त्यांनाच ही लस दिली जाईल, असे सांगताच उपस्थित लोकांमध्ये संभ्रम व गोंधळ उडालेला दिसून आला.
शासनाच्या गाइडलाइनप्रमाणे नावनोंदणी केल्यामुळे आपल्याला पहिल्या २०० मध्ये लस मिळेल, या आशेने पहाटे पाच वाजल्यापासून प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर महिला व युवकांनी गर्दी केली होती.
कोट : १८ ते ४५ वयोगटांतील नागरिकांची लसीसंदर्भात शासनाने नोंदणी करण्यास सांगितल्याप्रमाणे अनेकांनी ते रजिस्ट्रेशन केले, परंतु पुन्हा यात बदल झाल्यामुळे, तसेच या नोंदणी करताना खटाव लसीकरण केंद्रच दाखवत नसल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने निर्धारित केलेल्या पाच सेंटरपैकी कोणते सेंटर पाहिजे, ते तपासून आपल्याला जी तारीख लसीकरिता हवी असेल, ती घालून वेळ घेणे गरजेचे आहे.
-डॉ. युनूस शेख, तालुका वैद्यकीय अधिकारी, खटाव
०२खटाव
खटाव प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणास प्रारंभ करताना, प्रदीप विधाते, राहुल पाटील, रमेश काळे, नंदकुमार वायदंडे, डॉ.युनुस शेख आदी उपस्थित होते.