नांदगावला लसीकरण शिबिर राबवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:40 AM2021-05-11T04:40:46+5:302021-05-11T04:40:46+5:30
कऱ्हाड : सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे. पण लस टंचाईमुळे लोकांना नाहक हेलपाटे मारावे लागत आहेत. ...
कऱ्हाड : सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे. पण लस टंचाईमुळे लोकांना नाहक हेलपाटे मारावे लागत आहेत. ज्येष्ठ नागरिक व वृद्धांना याचा खूप त्रास होत आहे. त्यामुळे लसीची उपलब्धता लक्षात घेऊन आठवड्यातून एकदा नांदगाव (ता. कऱ्हाड) येथे लसीकरण शिबिर आयोजित करावे, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी संगीता देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, नांदगाव गाव हे काले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेमध्ये येते. हे अंतर अंदाजे पाच किलोमीटर आहे. नांदगावमधील लोक लसीकरणासाठी या केंद्रात जातात. पण लसीचा तुटवडा, ऑनलाईन नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी, त्यामध्ये असणाऱ्या त्रुटी यामुळे लोकांना लस उपलब्ध होत नाही. सार्वजनिक वाहतूक बंद असतानाही काहीतरी सोय उपलब्ध करून लसीकरण केंद्रावर पोहोचलेल्या लोकांना त्याठिकाणी लस उपलब्ध नाही, असे समजते. त्यामुळे लोकांना नाहक हेलपाटे मारावे लागत आहेत.
नांदगावच्या शेजारी ओंड हे गाव आहे. तेथे येवती प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र आहे. आठवड्यातून एकदा दर बुधवारी येथे लसीकरण होत असते. पण तेथे नांदगावचे लोक लसीकरणासाठी गेल्यावर कर्मचारी तुम्ही काले आरोग्य केंद्राच्या कक्षेत येता, तेव्हा तेथे नोंदणी करा, असा सल्ला देतात.
या सर्व बाबींचा विचार करून, लसींची उपलब्धता लक्षात घेऊन आपण आठवड्यातून एक दिवस नांदगाव येथे लसीकरण शिबिर घ्यावे. म्हणजे ज्येष्ठ व वृद्ध लोकांना याचा फायदा होईल. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी आम्ही तयार असल्याचेही प्रशांत सुकरे यांनी निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, या निवेदनाच्या प्रती गटविकास अधिकारी डाॅ. आबासाहेब पवार व काले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनाही देण्यात आल्या आहेत.