लसीकरण मोहीम जोरात; सिव्हिलमधील केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:54 AM2021-02-26T04:54:18+5:302021-02-26T04:54:18+5:30
सातारा : जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने लस घेण्यासाठी सिव्हिलमधील केंद्रावर आरोग्य कर्मचाऱ्यांनी गर्दी केली आहे. अगोदरच कोरोनाची ...
सातारा : जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने लस घेण्यासाठी सिव्हिलमधील केंद्रावर आरोग्य कर्मचाऱ्यांनी गर्दी केली आहे. अगोदरच कोरोनाची धास्ती असल्यामुळे सर्वचजण सोशल डिस्टन्सिंगची कोटेकोरपणे अंमलबजावणी करत होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वचजण काळजी घेत होते.
जिल्ह्यात गत दीड महिन्यापासून लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे. पहिल्या टप्प्यात २५ हजार कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. आता दुसरा टप्पा सुरू झाला असून, जिल्ह्यातील १६ केंद्रांवर ही लस दिली जात आहे. सिव्हिलमधील लसीकरण केंद्रावर गुरुवारी एकाचवेळी पस्तीस ते चाळीसजण उपस्थित होते. प्रत्येकाला खुर्चीवर बसविण्यात आले होते. पुढचा नंबर आल्यानंतर त्याची कागदपत्रे तपासून त्याला लस दिली जात होती. प्रत्येकाने तोंडाला मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन केल्याचे पाहायला मिळाले. प्रत्येकाने काळजी घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. हे कर्मचारी लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना वारंवार सूचना देत होते.
चाैकट : आतापर्यंत ८२ टक्के लसीकरण
जिल्ह्यात लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, दुसरा टप्पा आता सुरू झाला आहे. आतापर्यंत ८२ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. अद्याप काही ठिकाणी लसीकरण होणे बाकी आहे. लस घेण्यासाठी काही लोकांनी नोंदणी केली. मात्र, ऐनवेळी त्यांनी लस घेतली नाही. तरीसुद्धा शासकीय कर्मचारी लस घेताना जागृत दिसत आहेत. आता दुसरा टप्पा सुरू झाला आहे.
चाैकट : लस घेतल्यानंतर निरीक्षण..
लस घेतल्यानंतर संबंधिताला सुमारे तीस मिनिटे निरीक्षण कक्षात थांबविण्यात येत होते. जेणेकरून रिॲक्शन येतेय की काय, हे पाहण्यासाठी खबरदारी घेण्यात येत होती. त्यानंतरच त्यांना घरी सोडण्यात आले. लसीदरम्यान कोणालाही रिॲक्शन आले नाही.
कोट: लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येकाला नियम पाळणे बंधनकारक आहे. लसीदरम्यान देखरेख करण्यासाठी आम्ही दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करूनच प्रत्येकाला लस दिली जात आहे.
डाॅ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा
चाैकट : जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे आणि लसीकरण
सातारा- ८१ टक्के
फलटण- ८३
माण -७८
पाटण -७५
कोरेगाव- ७४
महाबळेश्वर- ७४
वाइ- ७३
खंडाळा-९०
खटाव-७२
कऱ्हाड ७२
जावळी- ७७
फोटो : २५ सिव्हिल सातारा