कोविड हॉस्पिटलमध्येच लसीकरण केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:40 AM2021-04-22T04:40:06+5:302021-04-22T04:40:06+5:30
ढेबेवाडी : प्रशासनासह स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतींंकडून कोरोना लसीकरणाबाबत आता घरोघरी प्रबोधन आणि जनजागृती केली जात असल्याने ढेबेवाडी विभागात ...
ढेबेवाडी : प्रशासनासह स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतींंकडून कोरोना लसीकरणाबाबत आता घरोघरी प्रबोधन आणि जनजागृती केली जात असल्याने ढेबेवाडी विभागात लसीकरण मोहिमेने गती घेतली आहे. अधुनमधून कोरोना लसीचा तुटवडा जाणवू लागल्याने ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर बुधवारी सकाळी झुंबड उडाली. यावेळी नंबरवरून किरकोळ बाचाबाचीचेही प्रकार घडले. विशेष म्हणजे, कोविड हॉस्पिटलमध्येच कोविड लसीकरण केंद्र उभारल्याने जनतेतून संताप व्यक्त होत आहे.
शासनाने कोविड लसीकरण मोहिमेबाबत अतिशय गांभीर्याने पावले उचलल्याने लसीकरण गतीने होत आहे. विभागात तळमावले, काळगाव, सणबूर, सळवे या चार प्राथमिक आरोग्य केंद्रांसह ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालय अशा पाच ठिकाणी नियमित लसीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत, तर गावोगावीही कॅम्पच्या माध्यमातून लसीकरण चालू आहे. मात्र, ढेबेवाडी हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथील लसीकरण केंद्रावर नेहमीच झुंंबड दिसून येते.
मध्यंतरी या केंद्रावर लसीचा तुटवडा जाणवला. अनेकांना लसच मिळाली नाही. आता येथे कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे येथे मोठी गर्दी होत आहे. त्यातच नोंदणी करताना अनेकदा तांत्रिक अडचणीही येत असल्याने लसीकरणासाठी आलेल्यांना ताटकळत बसावे लागत आहे. यातूनच मग नंबरसाठी वादावादीही होत आहे. दरम्यान, या लसीकरण केंद्राच्या इमारतीतच कोविड उपचार केंद्र असल्याने त्याचा संसर्गही होऊ शकतो. ही बाब आरोग्य विभाग गांभीर्याने घेणार का? हा प्रश्न असून कोविड लसीकरण इतरत्र हलवावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
फोटो आहे..
२१ढेबेवाडी
ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर बुधवारी सकाळी झुंबड उडाली आहे.