लसीकरणाचे वाटप व त्याचे आकडे रोज प्रसिद्ध व्हावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:38 AM2021-05-14T04:38:36+5:302021-05-14T04:38:36+5:30
कराड येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार ...
कराड येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, डीवायएसपी रणजीत पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके आदींची उपस्थिती होती
आमदार चव्हाण म्हणाले, कोविशील्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींच्या डोससाठी एक नियमावली प्रशासनाने तयार करावी. ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे अशांना दुसरा डोस देण्यासाठी प्राधान्य द्यावे. त्याचप्रमाणे १८ ते ४४ वयोगटासाठी जी ऑनलाईन नोंदणी केली जात आहे त्या प्रक्रियेमुळे लसीकरणात मोठा गोंधळ निर्माण होत आहे. या प्रक्रियेमुळे लसीकरणासाठी ज्या त्या व्यक्तीला कोणत्याही सेंटरला नंबर येत आहे. अगदी बाहेरील जिल्ह्यातील लोकांचासुद्धा नंबर आपल्या जिल्ह्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा परिस्थितीत स्थानिक लोकांशी वाद झाल्याच्या घटना घडत आहेत. यासाठी ऑनलाईन नोंदणी ही सक्तीची केली जाऊ नये. त्याचप्रमाणे ज्या ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना लस मिळत आहेत त्यांनी गावनिहाय लस देण्याचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.
लसीकरणाबाबत होत असलेला गोंधळ यामुळे पोलीस यंत्रणेवर ताण येत असल्याचेही या बैठकीत निदर्शनास आले. जर शासनाकडून लसीकरणाबाबतची योग्य प्रकारची नियमावली तयार करण्यात आली तर सध्या लसीकरणाबाबत जो गोंधळ होत आहे तो होणार नाही व लसीकरण होण्याची गती वाढेल.
दररोज जिल्ह्याला लसीचे किती डोस प्राप्त झाले त्यानुसार प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला व शहराला कशाप्रकारे लसींचे डोस वितरित होतील याची रोजची आकडेवारी सार्वजनिकरित्या प्रसिद्ध झाली पाहिजे. याचसोबत ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या भागात जी गावे लसीकरणासाठी दिली आहेत त्या गावांना त्याच दिवशी लस दिली गेली पाहिजे, अशा सक्त सूचनाही यावेळी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रशासनाला दिल्या.