काले प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत लसीकरण ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:38 AM2021-04-10T04:38:03+5:302021-04-10T04:38:03+5:30
मलकापूर काले प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड लसीकरण केंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लसीकरणाचे अचूक नियोजन केले होते. यामुळे केंद्राने ...
मलकापूर
काले प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड लसीकरण केंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लसीकरणाचे अचूक नियोजन केले होते. यामुळे केंद्राने कोविड लसीकरणात २ हजारांचा टप्पा पार केला आहे. मात्र, गुरुवारी १२० डोसनंतर लसच उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण बंद करावे लागले. मलकापूर शहरातील ५०० व काले प्राथमिक आरोग्य केंद्रात ३०० अशा नोंदणीकृत ८०० जणांसह हजारो नागरिक लसीच्या प्रतीक्षेत आहेत.
काले प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ५ उपकेंद्रे व मलकापूर शहरासह १४ गावे येतात. त्या गावांमधील ७८ हजार एवढी लोकसंख्या आहे. आरोग्य मंत्रालय महाराष्ट्र शासन यांनी लागू केलेल्या मानक कार्यप्रणालीनुसार जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काले प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू करण्यात आले होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र यादव व डॉ. तबस्सुम कागदी यांच्या अचूक नियोजनानुसार व सर्व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने मलकापूरसह इतर गावांत कोविड लस नागरिकांना दिली जात आहे.
१३ फेब्रुवारीला या आरोग्य केंद्रांत कोरोना लसीकरणास सुरुवात झाली. आज अखेर मलकापुरातील ३०० सह २ हजार जणांना कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लस देण्यात आली आहे. गुरुवारी केंद्राकडे उपलब्ध असलेले १२० डोस दिल्यानंतर लसीकरण बंद करावे लागले. सर्व सोय असूनही लस उपलब्ध नसल्यामुळे काले येथून नोंदणीकृत शेकडो लोकांना लस न घेताच परत जावे लागले.