कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:23 AM2021-07-23T04:23:26+5:302021-07-23T04:23:26+5:30
दहीवडी : कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव मार्ग आहे. ग्रामीण भागातील महिलांनी लस घेतल्याने घराघरांत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी ...
दहीवडी : कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव मार्ग आहे. ग्रामीण भागातील महिलांनी लस घेतल्याने घराघरांत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल. कोरोनाचे संकट टाळण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना लस देण्याचे काम हाती घेतले आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी केले.
एकीकडे लसीचा तुटवडा भासू लागला असताना आता माणदेशी फाउंडेशननेदेखील लसीकरणासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. ग्रामीण भागातील महिलांना लस उपलब्ध व्हावी यासाठी फाउंडेशनने पाचगणी येथील बेल एअर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने दहीवडी येथे लसीकरणाची व्यवस्था उपलब्ध केली आहे. या मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी विजय सिन्हा, सरव्यवस्थापिका रेखा कुलकर्णी, कार्यालयीनप्रमुख मनीषा कट्टे, रेश्मा पोळ, माणदेशी फाउंडेशनच्या माधुरी तोरणे, शाखाधिकारी पूनम महानवर, ओंकार गोंजारी, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद दीक्षित, बेल एअर रुग्णालय येथील अना जोकब, निशा मांडवकर, नौशीन शेख आदींची उपस्थिती होती.
दहीवडी येथील स्वाती मंगल कार्यालयात सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत लसीकरण केले जाणार आहे. लसीकरण करणाऱ्या महिलांना एक रोप मोफत दिले जात आहे. गोंदवले व दहीवडी परिसरातील वीस गावांतील एक हजारांहून अधिक महिलांना कोरोना लस देण्यात आली. वडूज येथे दि.२६ ते २८ जुलै या कालावधीत लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे.