अंभेरी ग्रामपंचायतीच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:28 AM2021-05-29T04:28:54+5:302021-05-29T04:28:54+5:30
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील अंभेरी ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गावामधील ग्रामस्थांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी लसीकरण मोहीम राबवली. ...
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील अंभेरी ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गावामधील ग्रामस्थांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी लसीकरण मोहीम राबवली. या मोहिमेमध्ये सुमारे सत्तर ज्येष्ठ नागरिकांनी लसीचा लाभ घेतला.
सध्याच्या विदारक परिस्थितीमध्ये लस घेण्यासाठी गावातील ज्येष्ठ नागरिकांना रहिमतपूर, कोरेगाव, सासुर्वे या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या ठिकाणी फेऱ्या माराव्या लागत होत्या. तरीही त्या ठिकाणी लसीचा अपुरा पुरवठा होत असल्याने केवळ हेलपाटेच नागरिकांना होत होते. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी व गावामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन गावात लसीकरण शिबिर राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. गावातील जिल्हा परिषद शाळेत आयोजित केलेल्या लसीकरण मोहिमेमध्ये सुमारे सत्तर ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली. तरीही लसीचा अपुरा पुरवठा असल्याने पुन्हा लस वाढती मिळवण्यासाठी व लसीकरण होण्यासाठी ग्रामपंचायत अंभेरी प्रयत्न करणार आहे. दरम्यान बाधित ग्रामस्थांसाठी प्राथमिक शाळेमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच विष्णू गायकवाड यांनी दिली.
यावेळी उपसरपंच रंजनाबाई कदम, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामदक्षता समिती सदस्य, ज्येष्ठ नागरिक शंकरराव संकपाळ, पोपटराव निकम, पोलीस पाटील बळीराम निकम, ग्रामसेवक चेतन टकले, तलाठी महेश पाटील, आरोग्य अधिकारी अनिल निकम उपस्थित होते.