वाधवान कुटुंबीय पाचगणीतील शाळेत बंदिस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 12:32 AM2020-04-13T00:32:31+5:302020-04-13T00:32:42+5:30
सर्व २३ जण होम क्वॉरंटाइनमध्ये; परिसरात कडक बंदोबस्त, छावणीचे स्वरुप
पाचगणी (जि. सातारा) : राज्यात संचारबंदी आणि टाळेबंदी असताना महाबळेश्वरमध्ये दाखल झालेल्या वाधवान कुटुंबीयांना पाचगणी येथील सेंट झेविअर्स हायस्कूलमध्ये होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. वाधवान कुटुंबीय येस बँक, डीएचएफएल आणि पीएमसी घोटाळ्यात संशयित असल्याने पाचगणी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.
लॉकडाऊन असताना उद्योगपती वाधवान कुटुंबीय व त्याचे नोकर असे २३ जण लोणावळा-खंडाळ्यातून महाबळेश्वरामध्ये दाखल झाले. गृहविभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान कुटुंबीयाना शिफारशीचे पत्र दिले होते. वाधवान कुटुंबीयांना सातारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने पाचगणी येथील सेंट झेविअर्स हायस्कूलमध्ये होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. शिफारशीची बाब उघडकीस आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने २३ जणांवर जिल्हाप्रवेश बंदी व संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले. तसेच त्यांची वाहने जप्त करण्यात आली आहेत. वाधवान कुटुंबीयांना पाचगणीत १४ दिवस ठेवण्यात येणार असल्याने परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या परिसरातून जाण्यास इतर लोकांना मनाई करण्यात आली आहे.
अजूनही मुंबईकर होतायत दाखल
अनेक मुंबईकर घाबरून गावाकडे पळ काढत आहेत. जावळीत संचारबंदी असतानाही मिळेल, त्या वाहनातून मुंबईकर रात्रीच्या वेळी प्रवास करून पोलीस प्रशासनाला गुंगारा देऊन चोरून तालुक्यात प्रवेश करीत आहेत. मेढा पोलिसांनी शनिवारी मुंबईमधून आलेल्या तिघांवर कारवाई केली.