वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीने निवृत्तिवेतन रखडवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:34 AM2021-02-15T04:34:04+5:302021-02-15T04:34:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीने सेवानिवृत्त झालेल्या दोन कर्मचाऱ्यांचे वेतन रखडवले असल्याने दोन कर्मचारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वडूज : वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीने सेवानिवृत्त झालेल्या दोन कर्मचाऱ्यांचे वेतन रखडवले असल्याने दोन कर्मचारी सोमवार, दि. १५ रोजी वडूज तहसील कार्यालयात बेमुदत उपोषण करण्याचा आहेत. याबाबत नामदेव देशमुख, चंद्रकांत गोडसे त्यांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे.
निवेदनातील माहिती अशी की, माजी सचिव नामदेव देशमुख व माजी पहारेकरी चंद्रकांत गोडसे हे वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीतून सेवानिवृत्त होऊन पाच वर्षे झाले आहेत. सेवा निवृत्तीची काही रक्कम दिली आहे. मात्र आज अखेर देशमुख यांची ९ लाख ५६ हजार देय रक्कम आहे. गोडसे यांचे आज अखेर सात लाख रुपये इतकी येणे बाकी आहे.
संचालक मंडळाने या रक्कमा दोन-तीन महिन्यांच्या टप्प्याटप्प्याने देण्याचे तोंडी व लेखी मान्य केले. परंतु या ठरावाचे पालन त्यांनी केले नाही. संचालक मंडळाची मुदत ही या महिन्याअखेर संपत आहे. त्यामुळे पुढील कार्यकाळासाठी येणारे संचालक मंडळ सेवानिवृत्तीनंतर मिळवायच्या रकमांबाबत जबाबदारी घेणार नाही त्यामुळे मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. गेली चार वर्षे शारीरिक, मानसिक त्रास झाला असून, आर्थिक नुकसान झालेले आहे.
मुलामुलींचे विवाह लांबणीवर पडले आहेत. दवाखाना, औषधोपचारासाठी पैसे उपलब्ध नाहीत. एप्रिल २०१९ मध्ये देशमुख यांच्या भावाला विद्युत वाहिनीचा शॉक लागून उपचारावेळी निधन झाले. यावेळी औषध उपचारासाठी दवाखान्यात असताना त्यांच्या उपचारासाठी संस्थेकडे पैशाची मागणी करून सुद्धा दिली नाही. संचालक मंडळाच्या मासिक सभेमध्ये संबंधित रकमा दोन-तीन महिन्यांच्या टप्प्याटप्प्याने देण्याचे मान्य केले होते, मात्र दिले नाहीत. यामुळे आमची मानसिक कुचंबणा झालेली आहे. त्यामुळे सोमवार, दि. १५ फेब्रुवारीपासून तहसील कार्यालय येथे आमरण उपोषण करणार आहे.
चौकट :
सचिवाकडून अपमानास्पद वागणूक
अनेक वर्षे वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चांगली सेवा केली आहे. त्यांच संस्थेच्या सध्याच्या सचिवाकडून अपमानास्पद वागणूक दिली जात आहे, अशी खंत माजी सचिव नामदेव देशमुख यांनी व्यक्त केली.