वडूज नगरपंचायत निवडणुकीत धक्कातंत्र!

By Admin | Published: October 19, 2016 11:46 PM2016-10-19T23:46:38+5:302016-10-19T23:46:38+5:30

कागदपत्रांसाठी धावपळ सुरू : तिरंगी लढतीची शक्यता; नवखे चेहरेही समोर येऊ लागले

Vaduz Nagar Panchayat elections crush! | वडूज नगरपंचायत निवडणुकीत धक्कातंत्र!

वडूज नगरपंचायत निवडणुकीत धक्कातंत्र!

googlenewsNext

वडूज : खटाव तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज नगरपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजल्याने आणि आचारसंहिता सुरू झाल्याने प्रशासनासह नेतेमंडळींची एकच धावपळ उडाली आहे. ‘आत्ता नाही तर कधीच नाही’ हे ज्ञात असलेल्या उमेदवारांनी निवडणुकीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. कधी नव्हे ते ग्रामपंचायतीकडे फिरकणारे नवखे चेहरेही नगरपंचायतीकडे वळू लागल्याचे पाहून नागरिकांना आश्चर्याचा कळत-न-कळत धक्का बसत आहे. हेच धक्कातंत्र या निवडणुकीत दिसून आले तर त्यात नवल वाटणार नाही. दरम्यान, या निवडणुकीत तिरंगी लढतीचे संकेत मिळत आहेत.
जिल्ह्यासह खटाव-माण तालुक्यांचे लक्ष लागून राहिलेली वडूज नगरपंचायत निवडणूक अतिशय चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे. कारण यापूर्वी गेल्या महिन्यापासून कोणताही कार्यक्रम असो स्थानिक नेत्यांसह तालुक्यातील इतर नेते एकही संधी न सोडता पक्षीय पातळीवर टीका करताना आढळत आहेत. आ. जयकुमार गोरे यांनी जिल्हा पातळीवरील बैठकीत सर्वच निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादी आणि भाजपा यांचे मेळावे एकाच दिवशी झाल्याने तळ्यात-मळ्यात वावरणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी गोची झालेली आहे. भाजपाच्या मेळाव्याला प्रतिसाद होता तर राष्ट्रवादीच्या मेळाव्याला कमी प्रतिसाद जाणवला. मात्र भाषणबाजीत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी स्वबळावरची भाषा केली असली तरी या दोघांचा पक्षीय शत्रू मात्र काँग्रेसच आहे. असे असताना अजूनही शिवसेनेची भूमिका गुलदस्त्यातच राहिल्याने वडूज नगरपंचायत निडणुकीला पाहिजे तसा रंग भरलेला नाही. त्यात रासप पक्षाची पावले नेमकी कोणीकडे चालली आहेत हे स्पष्ट न झाल्याने महायुती की युती विना? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी वडूजमध्ये येऊन कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. याचा पक्षाला निश्चित फायदा होईलच. मात्र, ही निवडणूक अटीतटीची असल्यामुळे विजयाकडे घोडदौड करणाऱ्या उमेदवारालाच उमेदवारी देण्याचे निकष लावले जातील असा प्रारंभी अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु राजकीय डावपेचात माहीर असलेले आ. गोरे यांच्या व्यूहरचनेकडे सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे. उलट-सुलट चर्चांमुळे वडूजमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, अचानक नगरपंचायतीच्या तारखा जाहीर झाल्याने ही निवडणूक क्रिकेटच्या टष्ट्वेंटी-टष्ट्वेंटी सामन्यासारखी होईल यात तिळमात्र शंका नाही.
खटाव तालुक्याचे विधानसभा मतदार संघात त्रिभाजन झाले असले तरी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका या तालुकाधर्तीवरच होणार असल्याने पक्षीय पातळीवर वरिष्ठांकडून इतर निवडणुकाबाबत मौन धरले जात आहे. आजपर्यंत वडूज ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षविरहित होत होती. परंतु पहिल्यादांच होणाऱ्या नगरपंचायतीला सर्वच पक्षांनी मोट बांधली आहे. त्यामुळे ही निवडणूक पक्षीय होणार की पक्षविरहित याकडे सर्वच राजकीय जाणकरांसह वडूजकरांचे लक्ष लागून राहिले आहे. तालुक्याबाहेरील नेत्यांना आपले राजकीय अस्तिव टिकविण्यासाठी स्थानिक नेत्यांना हाताशी धरूनच नगरपंचायतील व्यूहरचना आखणे क्रमप्राप्त असले तरी स्थानिक नेता डोईजड होऊ नये याचीही काळजी प्रामुख्याने घेतली जात असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि महायुती अशी निवडणूक झाली तर या तिरंगी निवडणुकीत महायुती आणि काँग्रेस यांच्या सभाने शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. नगरपंचायत आपल्याच ताब्यात असावी या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत. (प्रतिनिधी)

वाढत्या संख्येने नेतेमंडळींना डोकेदुखी...
इच्छुक उमेदवारांची वाढती संख्या पाहता नेतेमंडळींची डोकेदुखी ठरू लागली आहे. असे असले तरी ‘तुम्ही इकडून उमेदवारी देत नाही, तर तिकडून आपल्या नावाची चर्चा आहे,’ असा गर्भित इशाराही देण्यास हे इच्छुक उमेदवार मागे पुढे पाहत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे उमेदवारीबाबत मौन बाळगणे हेच उचित समजून वरिष्ठ पातळीवरील नेत्यांसह स्थानिक नेतेही वेळ मारून नेत आहेत.

Web Title: Vaduz Nagar Panchayat elections crush!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.