कोरोना साखळी तोडण्यासाठी वडूजकर सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:37 AM2021-04-13T04:37:16+5:302021-04-13T04:37:16+5:30
वडूज : कोरोना महामारीचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून दर आठवड्याच्या ...
वडूज : कोरोना महामारीचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून दर आठवड्याच्या शनिवार व रविवार या दिवशी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. प्रशासनाच्या धाकापेक्षा वडूजकरांनीच धास्ती घेतल्याने या महामारीची साखळी तोडण्यासाठी वडूजकर सज्ज झाले आहेत.
वडूज शहरात दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने वडूजकरांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या कारणानेच प्रशासनाच्या धाकापेक्षा कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी वडूज शहरातील नागरिकांनी नियमांची पायमल्ली न करता स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळला. यामुळे प्रशासनालाही होणारा अतिरिक्त ताण टळला. मेडिकल्स, रुग्णालये याव्यतिरिक्त कोणतीही दुकाने उघडी नव्हती. वाढत्या रुग्णसंख्येमुळे वडूजकर भयभीत आहेत आणि सोशल मीडियावर बेड्स व व्हेंटिलेटर्स यांचा जिल्ह्यात तुटवडा आहे. यामुळे नेहमी गजबजलेले रस्ते सुनसान वाटू लागले आहेत. वडूज आगाराची बससेवा पूर्णतः ठप्प होती. तसेच शासकीय कार्यालये वीकेंड असल्याकारणाने बंद होती. त्यामुळे तालुक्यातील ये-जा करणाऱ्या नागरिकांची होणारी वर्दळ पूर्णपणे थांबली होती.
शहरातील भयभीत झालेले नागरिक घरातच थांबले होते. काही अपवाद वगळता शहरातील रस्त्यांवर तुरळक प्रशासनाचे कर्मचारी दिसून येत होते. रस्त्यावरील चौका-चौकात प्रशासनातील कर्मचारी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि कोरोना महामारीची साखळी तोडण्यासाठी सुसज्ज झाले आहेत.
फोटो : १२ वडूज फोटो
फोटो :
वडूज शहरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ( शेखर जाधव )