वडूजकरांनो, कोरोनाला हरवायचे असेल तर रणनीती महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:40 AM2021-04-22T04:40:04+5:302021-04-22T04:40:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : कोरोना महामारीचे गांभीर्य प्रचंड असल्याने त्यावर टीकाटिप्पणी करण्याऐवजी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे. तशा ...

Vaduzkars, strategy is important if you want to defeat Corona | वडूजकरांनो, कोरोनाला हरवायचे असेल तर रणनीती महत्त्वाची

वडूजकरांनो, कोरोनाला हरवायचे असेल तर रणनीती महत्त्वाची

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

वडूज : कोरोना महामारीचे गांभीर्य प्रचंड असल्याने त्यावर टीकाटिप्पणी करण्याऐवजी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे. तशा व्यक्तिगत भावनांचे काहूर सोशल मीडियावर माजले आहे. मात्र, वडूजकर नेहमीच अशा भूमिकेवेळी पाठीमागेच राहिले आहेत. हा इतिहास हुतात्मानगरीला खोडून काढण्याची नामी संधी निर्माण झाली आहे. ही लढाई स्वत:ची स्वत:शीच आहे, हेही विसरून चालणार नाही. शहरातील‌ जलदगतीने वाढलेल्या कोरोनाच्या आक्रमणाला प्रत्युत्तर देऊन हरवायचे असेल, तर राजकारणाचे जोडे व व्यक्तिगत मतभेद बाजूला ठेवून रणनीती आखणे काळाची गरज बनली आहे.

दुसरी लाट ओसरेलही, पण मग इतर देशांसारखी तिसरी लाट येण्याची नामुश्की तरी आपणावर ओढवणार नाही, याची खबरदारी घेऊन उपाय निर्माण केले पाहिजेत. सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी, सेवानिवृत्त जवान व इतर क्षेत्रांतील अनुभवी नागरिकांचा समावेश करून घेता आला पाहिजे. मुळात साथरोग हा उपचारांचा नव्हे तर संसर्ग प्रतिबंध करण्याचा रोग आहे. हे येथील प्रशासनाने समजून रणनीती ठरवली पाहिजे. प्रशासन भविष्यवेध, पूर्वतयारी आणि अंमलबजावणी या त्रिसूत्रीवर चालते. भविष्यवेध आणि पूर्वतयारी या दोन्ही बाबतीत आपण कमी पडलो.

मायक्रो प्रशासकीय युनिटची गरज

अत्यंत छोट्या भौगोलिक क्षेत्राकरिता एक तात्पुरते मायक्रो प्रशासकीय युनिट निर्माण करण्यात येऊन त्यांच्यावर कोरोना प्रतिबंध ते उपचाराबाबत समन्वयाची जबाबदारी टाकण्याची ही वेळ आहे. शहराची लोकसंख्या सुमारे २५ हजार आहे. दैनंदिन स्वच्छता, आरोग्य फवारणी यावेळेत नगरपंचायत प्रशासनाच्या सुसूत्रतेचे दृश्य दिसून येत आहे. हे शेकडो कर्मचारी १७ प्रभागांत विभागले, तर रणनीती आखणे सुकर होईल. त्यांच्याकडून मास्क, सामाजिक अंतर, स्वच्छता, ॲम्ब्युलन्सची सोय, बेडची उपलब्धता, औषधांचा पुरवठा आदींबाबत अत्यंत प्रभावीपणे हाताळणी होऊ शकते. त्यांना पोलिसांचा जोड मिळाला, तर अधिक उत्तम होईल.

लोकसहभाग महत्त्वाचा

कोरोनाविरोधातील चळवळीत लोकसहभाग अभावानेच दिसतो. यामध्ये सेवानिवृत्त शिक्षक, स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था सहभागी करून घेता येतील. हे लोक मायक्रो युनिटमध्ये 'कोरोना प्रतिबंध' ही संकल्पना स्पर्धेप्रमाणे राबवू शकतात आणि युनिट कंटेनमेंटमध्ये कसे येऊ द्यायचे नाही, याची जबाबदारी ते आपोआपच घेतील. एखाद्या युनिटमध्ये संसर्ग वाढू लागला, तर वरिष्ठ पातळीवरून त्याक्षणी हस्तक्षेप करता येईल. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकांच्या वेळी बुथ कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करतात. याही कार्यकर्त्यांची मदत घेता येईल.

अधिकाऱ्यांकडून कारवाईची गरज

प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, नगरपंचायत मुख्याधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, मंडलाधिकारी, तलाठी यांनी शहरात कधीही जाऊन मास्क, सामाजिक अंतर आदींबाबतीत कारवाई केल्यास वातावरणनिर्मिती होऊ शकते. मायक्रो युनिटमध्ये औषध दुकानदार, डॉक्टरांकडे येणारे रुग्ण, याबाबत माहिती संकलित करून सर्दी, खोकला किंवा तापाचे रुग्ण प्राथमिक अवस्थेतच शोधले, तर प्रादुर्भाव रोखता येतो. यावर आणखीही प्रभावी मार्ग असू शकतात. फक्त शोधण्याची मानसिकता नगरपंचायत प्रशासन व येथील नेतेमंडळी आणि प्रशासनाकडे असणे आवश्यक आहे. ही महामारी आहे, राजकारण नव्हे. सर्वांना सहभागी करून घेऊन रणनीती आखली, तरच यावर मात होऊ शकेल.

Web Title: Vaduzkars, strategy is important if you want to defeat Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.