राजाळे येथील वैभव भोईटे यांना लडाखमध्ये वीर मरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 02:59 PM2023-08-20T14:59:49+5:302023-08-20T15:00:00+5:30
लडाखमध्ये लष्कराच्या वाहनास झालेल्या अपघातात राजाळे (ता.फलटण) येथील वैभव संपतराव भोईटे या जवानांस वीर मरण आले.
नसीर शिकलगार
फलटण(प्रतिनिधी) - लडाखमध्ये लष्कराच्या वाहनास झालेल्या अपघातात राजाळे (ता.फलटण) येथील वैभव संपतराव भोईटे या जवानांस वीर मरण आले. सपूर्ण राजाळे आणि परिसरात शोककळा पसरली आहे, वैभव भोईटे यांचे पार्थिव उद्या दुपारी राजाळे येथे येईल शासकीय इतमानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
शनिवारी दिनांक १९ रोजी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास दक्षिण लढाख मधील न्योमा जिल्ह्यातील कियारीजवळ लष्करी वाहनाचा अपघात होऊन नऊ जवान ठार झाले होते. लडाख कियारी जवळ सात किमी अतरावर ही घटना घडली. हे जवान गॅरीस हून लेहजवळच्या क्यारी शहराच्या दिशेने निघाले होते.
वैभव यांच्या पश्चात पोलीस पत्नी प्रणाली , मुलगी हिंदवी (वय वर्षे दिड वर्ष), आई बिबीताई , वडील संपतराव धोंडीबा भोईटे, दोन विवाहित बहिणी दोन चुलते मोहन भोईटे, विलास भोईटे (जेलर अधिकारी) असा परिवार आहे. या घटनेने राजाळे गावात शोक काळापासून सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती.
लष्कराचा ट्रक दरीत कोसळला
लडाखमधील दक्षिण भागात न्योमा येथील कियारी परिसरात शनिवारी लष्कराचा एक ट्रक दरीत कोसळून झालेल्या अपघातात नऊ जवान शहीद तर एक जवान जखमी झाला. शहीद जवानांबद्दल संरक्षणमंत्री राजनाथसिंह, गृहमंत्री अमित शाह यांनी दु:ख व्यक्त केले.
या नऊ शहीद जवानांमध्ये एका ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसरचाही समावेश आहे. लेह येथील वरिष्ठ पोलिस अधीक्षक पी. डी. नित्या यांनी सांगितले की, या लष्करी ट्रकमधून १० जवान प्रवास करीत होते. हा ट्रक लेह येथून न्योमाला चालला होता. त्यावेळी चालकाचे नियंत्रण सुटून हा ट्रक दरीत कोसळला. ही दुर्घटना शनिवारी संध्याकाळी ४.४५ वाजता घडली.