वैभवचा सुरू झाला
By admin | Published: July 6, 2014 11:06 PM2014-07-06T23:06:28+5:302014-07-06T23:16:17+5:30
वैमानिक होण्याचा प्रवास!
हवाई सफरीचा मान : ‘लोकमत संस्काराचे मोती’ निसर्ग सफारी स्पर्धा
सातारा : ‘लोकमत संस्काराचे मोती’ तर्फे आयोजित केलेल्या ‘हवाई सफर’ योजनेचा मान अण्णासाहेब राजेभोसले प्राथमिक शाळेचा (हत्तीखाना) विद्यार्थी वैभव सूर्यकांत जाधव याला मिळाला आहे. वैभवने वैमानिक होण्याचे स्वप्न अगदी लहानपणीच पाहिले होते. हे स्वप्न साकार होण्याच्या दिशेने वैभवचे पहिले पाऊल ‘लोकमत’च्या माध्यमातून पडणार आहे.
‘लोकमत’ने या यशाबाबत जाधव कुटुंबाची प्रतिक्रिया जाणून घेतली. गेल्या दशकापासून हे कुटुंब ‘लोकमत’चे वाचक आहे. मुलांच्या ज्ञानात भर पडण्याच्या उद्देशाने ‘लोकमत’ नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते. प्रामुख्याने मुलांचे सामान्यज्ञान वाढविण्यासाठी या योजना फायद्याच्या ठरतात. वैभवच्या दोन्ही बहिणी अभया व अनुजा या अगदी सुरुवातीपासूनच ‘लोकमत’च्या योजनांमध्ये सहभाग घेत असत. बक्षीस मिळविण्याची अपेक्षा न धरता सामान्यज्ञानात भर पडेल आणि भविष्यात स्पर्धेच्या युगात त्याचा निश्चित फायदा होईल, या हेतूने त्या नेहमी या योजनांमध्ये सहभागी व्हायच्या.
वैभव अवघा नऊ वर्षांचा आहे. त्याच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदाविण्यासाठी त्याच्या दोन्ही बहिणी कटाक्षाने प्रयत्न करत असतात. वैभव ‘लोकमत’च्या बालविकास मंचचा सभासदही आहे. त्याने या योजनेत सहभागी होण्याचे ठरविले. कुटुंबीयांनीही त्याच्या या जिज्ञासेला खतपाणी घातले. ‘लोकमत’मध्ये या योजनेअंतर्गत माहिती आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांचे एक कूपन प्रसिद्ध होत होते. ते त्यांनी नित्त्यनियमाने चिकटवून ‘लोकमत’कडे पाठविले. हजारो विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.
‘लहानपणी वैभव विमानाला भीत होता. उन्हाळ्यात स्लॅबवर झोपायला गेल्यानंतर आकाशात विमानाची लुकलुकणारी लाईट पाहताच तो दचकून डोळे मिटून घ्यायचा. मात्र, आता त्याला वैमानिक व्हायचे आहे. तसे त्याने बोलून दाखविले. ‘लोकमत’ने त्याच्या पंखांना बळ दिल्याची जाणीव यानिमित्ताने होते. कदाचित त्याने जे स्वप्न पाहिले आहे, ते भविष्यात सत्यात उतरण्यासाठी हा शुभसंकेतच असावा,’अशी भावना वैभवचे वडील सूर्यकांत जाधव व आई शोभा जाधव यांनी यावेळी व्यक्त केली. (प्रतिनिधी)