वैराटगड अजूनही धुपतोय वणव्याच्या धुरांनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:34 AM2021-03-14T04:34:23+5:302021-03-14T04:34:23+5:30
कुडाळ : गेल्या अनेक दिवसांपासून जावळीच्या डोंगर-दऱ्यांना वणव्याच्या झळा पोहोचत आहेत. पश्चिम भागातील केळघर, गांजे, कुसुंबी, तसेच कास ...
कुडाळ : गेल्या अनेक दिवसांपासून जावळीच्या डोंगर-दऱ्यांना वणव्याच्या झळा पोहोचत आहेत. पश्चिम भागातील केळघर, गांजे, कुसुंबी, तसेच कास परिसरातील डोंगरभाग वणव्याच्या आगीत होरपळून काळवंडला आहे. यातच कुडाळ परिसरातील करंदोशी, मेरुलिंग या भागांतील डोंगरांनाही वणवे लागले. आता वैराटगडाला लागलेल्या वणव्याने तोही धुपतोय. यामुळे डोंगरातून धुराचे लोट निघताना दिसत आहेत.
उन्हाळ्याची चाहूल लागतच झाडांची पानगळ होते. पुन्हा एकदा नव्या पालवीने सजण्यासाठी, नव्या शृंगारासाठी निसर्ग तयार होतो; परंतु नेमके याच दिवसात सगळीकडे वणव्यांची मालिकाच सुरू झालेली पाहायला मिळाली. डोंगरावरील वाळलेल्या पालापाचोळ्याला विघ्नसंतोषी मानसिकतेतून एका काडीने सारा हिरवागार दिसणारा निसर्ग काळाकुट्ट होऊन बसला. यामध्ये निसर्गाची आणि या अधिवासात राहणाऱ्या निष्पाप सूक्ष्म जीवांची अपिरिमित हानी झाली. याचा जंगली प्राण्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागला. यामध्ये अनेक प्राण्यांचा नाहक बळी जाऊन दुर्मीळ वनसंपदा नष्ट होत आहे. शुक्रवारी कुडाळ परिसरातील वैराटगडाला अशाच विघ्नसंतोषी प्रवृत्तींची नजर लागली. कोप झाल्यासारखा डोंगरावर वणव्याच्या ज्वाळांनी लखलखाट दिसू लागला. डोंगरावरील वनसंपदा या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आजही डोंगरातून धुराचे लोट निघत आहेत. नेमके या वणव्यांचे सत्र कधी थांबणार, असा सवालही आता निर्माण होऊ लागला आहे. अशा विघातक वृत्तींना आपणच आळा घालायला हवा. वणवा लावणाऱ्यांची माहिती वनविभागाला कळवावी. निसर्गाच्या संवर्धनासाठी आणि आपले जीवन समृद्ध होण्याकरिता विवेकला साद घालणे ही आज काळाची गरज आहे.
१३वैराटगड
फोटो: वैराटगडाला लागलेल्या वणव्याने अजूनही डोंगरातून धुराचे लोट निघत आहेत.