जिल्ह्यात चैत्र महिन्यातच वैशाख वणवा
By Admin | Published: April 20, 2017 10:36 PM2017-04-20T22:36:45+5:302017-04-20T22:36:45+5:30
वाईत दोन ठिकाणी घटना : अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी आग विझविली; वैरणीसह अवजारे, झाडे खाक
वाई/बावधन : कणूर-बावधन, ता. वाई येथील ओढा परिसरात आग लागल्याने शेतकऱ्यांच्या कडब्याच्या गंजी, शेतीची अवजारे, झाडे, बैलगाडी असे साहित्य जळून खाक झाले. या आगीत लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अग्निशमन बंबाच्या तीन गाड्यांच्या मदतीने स्थानिक तरुणांनी अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणली. सकाळी साडेदहाच्या सुमारास लागलेली आग दुपारी दोनच्या सुमारास विझविण्यात यश आले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कणूर येथील बाबीचा ओढ्यास आग लागल्याने सुमारे दीड किलोमीटर परिसरातील ओढा व बाजूच्या परिसरात ही आग पसरली. ओढ्यानजीकच्या खाशाबा बापू राजपुरे, धर्मू बापू राजपुरे, अंकुश ग्यानबा शिंदे, अशोक कृष्णा राजपुरे या शेतकऱ्यांच्या दोन कडब्यांंच्या गंजी, १२ नारळाची झाडे, ७ आंब्याची झाडे, २५ करंज व लिंबाची झाडे, ६ कळकीची बेटे, १ बैलगाडी, शेती अवजारे, १ विद्युत मोटर, ५२ प्लास्टिक पाईप, २ पाण्याच्या टाक्या, २ ट्रॉली जळण अशी सुमारे ३ लाख रुपयांची हानी या आगीत झाली.
सकाळी साडेदहाच्या सुमारास आग लागल्याचे समजताच कणूरमधील युवक व ग्रामस्थांनी विहिरीवरील मोटर पाईपलाईन, बोअरवेलवरील पाण्याच्या साह्याने आग विझविण्यास सुरुवात केली. धाडसाने काही युवकांनी
कडब्याच्या गंजीलगत बांधलेली जणावरे सोडवल्याने ती
बचावली. दरम्यान, वाई पालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला.
थोड्याच वेळात किसन वीर साखर कारखान्याचा व पाचगणी नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन ैबंबाच्या साह्याने युवकांनी आग आटोक्यात आणली.
आगीची बातमी समजताच सूतगिरणीचे अध्यक्ष शशिकांत पिसाळ, मदन भोसले, नितीन मांढरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष काशिनाथ शेलार, ग्रामपंचायत सदस्य तानाजी कचरे, पोलिस निरीक्षक विनायक वेताळ, सहायक पोलिस निरीक्षक कदम व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
मंडलाधिकारी एन. एस. भांदीर्गे, तलाठी एस. बी. साबणे यांनी पंचनामा केला. (प्रतिनिधी)
आगीत एका म्हशीचा मृत्यू...
वाई शहराजवळ यशवंतनगर आहे. येथील सोनजाईदेवी रस्त्यावर दादा सावंत यांचे जनावरांचे छप्पर आहे. गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास या छपराला आग लागली. यामध्ये एका म्हशीचा आगीमुळे भाजून मृत्यू झाला. तर यावेळी दावे तोडल्याने बैल वाचला. दरम्यान, डोंगराच्या बाजूला आग लागली होती. ती आग सावंत यांच्या गोठ्यापर्यंत आली. त्यामुळे ही दुर्घटना घडली, असे सांगण्यात येत आहे. गुरुवारी दिवसभरात वाई तालुक्यात आगीच्या दोन घटना घडल्या आहेत.