पुनर्रोपण केलेल्या शंभर वर्षांच्या वटवृक्षासोबत साजरा केला 'व्हॅलेंटाईन डे'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 02:10 PM2022-02-15T14:10:01+5:302022-02-15T16:45:18+5:30

सयाजी शिंदे यांनी वटवृक्षाला केला अभिषेक

Valentine's Day with a hundred year old replanted banyan tree | पुनर्रोपण केलेल्या शंभर वर्षांच्या वटवृक्षासोबत साजरा केला 'व्हॅलेंटाईन डे'

पुनर्रोपण केलेल्या शंभर वर्षांच्या वटवृक्षासोबत साजरा केला 'व्हॅलेंटाईन डे'

Next

सातारा : शंभर वर्षांपूर्वीच हडपसर येथील वडाला साताऱ्यात पुनर्रोपणाद्वारे जीवदान देण्यात अभिनेते सयाजी शिंदे यांच्या ‘सह्याद्री देवराई’ संस्थेला यश आले. वृक्षांचे मानवतेशी असलेले श्वासाचे नाते चिरंतन रहावे म्हणून १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत म्हसवे येथे या वटवृक्षासोबत अनोखा 'व्हलेंटाईन डे ' साजरा करण्यात आला.

२० हुतात्मा जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २० झाडे लावण्यात आली. वृक्षाची महती सांगणारी गाणी गाण्यात आली. कवी विठ्ठल वाघ यांनी ‘झाड वडाचे ताठ उभे’ हे गीत या समारंभासाठी पाठवले होते. त्याचे गायन करण्यात आले.

शंभर वर्षांचं झाड पुनरुज्जीवन करायला फक्त २५ हजार खर्च आला. अडचण होते, म्हणून ही झाडं काढून टाकून देता कामा नये. हा तर राष्ट्रीय वृक्ष आहे, त्याचे सन्मानाने २६ जानेवारी रोजी म्हसवे (सातारा) येथे पुनर्रोपण करण्यात आले.

निवडणुकीत जिंकला तरी एखाद्याची आपण मिरवणूक काढतो, इथे तर शंभर वर्षांचा राष्ट्रीय वृक्ष वाचला आहे. म्हणून त्याच्या पालवीसोबत प्रार्थना करण्यात आली. सुवासिनींनी पूजा केली. सयाजी शिंदे यांनी वटवृक्षाला अभिषेक केला.

जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, श्रीकांत इंगळहळीकर, धनंजय शेडबाळे, मुकेश धीवर, मनोज बाविसकर, सुजीत जगदाळे, बाळासाहेब पानसरे, भानुदास गायकवाड, डॉ. रोशनआरा शेख, प्रा. तानाजी देवकुळे, प्रा. केशव पवार, प्रा. डॉ. बाबासाहेब कांगुने, डॉ. सचिन माने, प्रा. रवींद्र महाजन, प्रा. रामचंद्र गाडेकर, राजेंद्र आफळे, प्रा. विजय निंबाळकर, शाहीर चरण उपस्थित होते. प्रा. सुजीत शेख यांनी सूत्रसंचालन केले.

अडचण होत आहे असे समजून वड कापायला निघालेल्या हडपसरच्या एका व्यक्तीकडून आम्ही शंभर वर्षे वयाचा हा वटवृक्ष शास्त्रोक्त पद्धतीने पुनर्रोपणासाठी हलवला. लांब ट्रकमधून साताऱ्याला गोळीबार मैदान, म्हसवे येथे नेऊन पुनर्रोपण केले. त्याला जीवदान मिळून पालवी फुटली आहे. - सयाजी शिंदे, सह्याद्री देवराई संस्थेचे संस्थापक

Web Title: Valentine's Day with a hundred year old replanted banyan tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.