वणवा डोंगराला, आग वाहनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:40 AM2021-04-08T04:40:37+5:302021-04-08T04:40:37+5:30

खंडाळा : पुणे-सातारा आशियाई महामार्गावरील खंबाटकी घाटात एका मालवाहतूक ट्रकने पेट घेतला. त्यानंतर ट्रकमधील पेटलेली पावडर रस्त्यावर पसरल्याने पाठीमागून ...

Vanava mountain, fire vehicle | वणवा डोंगराला, आग वाहनाला

वणवा डोंगराला, आग वाहनाला

Next

खंडाळा : पुणे-सातारा आशियाई महामार्गावरील खंबाटकी घाटात एका मालवाहतूक ट्रकने पेट घेतला. त्यानंतर ट्रकमधील पेटलेली पावडर रस्त्यावर पसरल्याने पाठीमागून येणाऱ्या कारनेही पेट घेतला. त्यामुळे या घटनेत दोन्ही वाहने जळून खाक झाली. खंबाटकी घाटात हरेश्वर डोंगराला लागलेल्या वणव्यामुळे वाऱ्याने ठिणगी पसरून ट्रकने पेट घेतला. त्यामुळे घाटात ‘वणवा डोंगराला अन् आग वाहनाला’ अशी परिस्थिती झाली.

खंबाटकी घाटात दुपारी दोन वाजेच्या सुमारास आगीमुळे धुराचे लोट दिसून येत होते. घाटातील जंगलभागात लागलेल्या वणव्यामुळे घाटातून कोल्हापूर जाणारा मालट्रक (एमएच १० सीआर ५५५०) मधील स्टेबल ब्लिचिंग पावडरने पेट घेतला. ट्रकने अचानक पेट घेतला आणि मोठी आग लागली. त्यापाठोपाठ मागून येणाऱ्या स्विफ्ट कार (एमएच १४ जीएफ २६८५) या कारनेही आगीमुळे पेट घेतला.

दोन्ही गाड्या पूर्णपणे जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले. महामार्गावरील या अग्नितांडवाने खळबळ उडाल्याने घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशमक दल व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वणवा विझवण्याबरोबरच वाहनांना लागलेली आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीमुळे घाटातील वाहतूक ठप्प झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबली आहे. खंडाळा पोलिसांनी सर्व वाहने बोगदामार्गे वळवून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.

खंबाटकी घाट परिसरात असणाऱ्या हरेश्वर डोंगररांगेला या महिनाभरात तिसऱ्यांदा वणवा लागण्याचा प्रकार घडला आहे. या वणव्यामुळे संपूर्ण डोंगर आगीच्या भक्षस्थानी पडले असून यामुळे वनसंपदेचे मोठे नुकसान झाले आहे. याच वणव्यामुळे घाटातील वाहनांना आग लागण्याचा प्रकार घडल्याने वनविभागाने वणवाविरोधी कठोर कारवाई करावी, अशी मागणी बळ धरू लागली आहे. वास्तविक खंडाळ्यातील हरेश्वर संवर्धन संघटनेचे निसर्गप्रेमी वणवा विझविण्याचे काम सातत्याने करीत आले आहेत. मात्र, त्यांच्याकडे आधुनिक यंत्रणा नसल्याने मोठा वणवा विझवताना त्यांचे प्रयत्न तोकडे पडतात.

फोटो

०७खंडाळा

खंबाटकी घाटात हरेश्वर डोंगराला लागलेल्या वणव्यामुळे वाऱ्याने ठिणगी पसरून ट्रकने पेट घेतला.

Web Title: Vanava mountain, fire vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.