Lok sabha 2024: साताऱ्यात ‘वंचित’ फॅक्टर निष्प्रभ; मुख्य लढत आघाडी अन् युतीतच
By नितीन काळेल | Published: April 1, 2024 07:09 PM2024-04-01T19:09:58+5:302024-04-01T19:10:44+5:30
अनामतही जप्त : साखरपट्टयात रुजलाच नाही
सातारा : सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीचा उमदेवार अजून ठरला नसलातरी ‘वंचित’ने आघाडी घेतली आहे. पण, साताऱ्याच्या या साखरपट्टयात दोन निवडणुका लढूनही वंचितला अनामत रक्कमही टिकवता आली नाही. कारण, येथील लढाई ही आघाडी आणि युतीतच होते. आताही तसेच चित्र आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघ पूर्वीपासून आहे. २००९ मध्ये लोकसभा मतदारसंघाची पुर्नरचना झाल्यानंतर साताऱ्यातील माण आणि फलटण विधानसभा मतदारसंघाचा समावेश माढ्यात करण्यात आला. सध्या सातारा मतदारसंघात सातारा-जावळी, पाटण, कऱ्हाड उत्तर आणि दक्षिण, कोरेगाव, वाई हे सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. २००९ पासून या मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेसचाच निवडूण आलाय. त्यामुळे सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ठरलाय. मात्र, या बालेकिल्ल्यालाच पोखरलंय. राष्ट्रवादीतील अनेकांनी कमळ हाती घेतलंय.
त्यातच राष्ट्रवादीची दोन शकले झाल्यानंतरही ताकद विभागलीय. मागील सहा महिन्यात कोणतीही मोठी निवडणूक झाली नसल्याने ताकद कोणत्या राष्ट्रवादीची हे समोर आलेले नाही. तरीही आताच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीची (शरद पवार आणि अजित पवार गट) सातारा लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी आहे. यातील शरद पवार गटाकडेच आघाडीतून मतदारसंघ आहे. तर अजित पवार गटाकडून मतदारसंघ मिळविण्याचा प्रयत्नच होतोय. त्यामुळे निवडणूक जाहीर होऊन १५ दिवस झालेतरी आघाडी आणि युतीचे उमेदवार ठरलेले नाहीत. अशा काळात वंचित बहुजन आघाडीने उमेदवारीचे फासे टाकले आहेत.
वंचितने मारुती जानकर यांना मैदानात उतरवले आहे. उमेदवारी लवकर जाहीर झाल्याने वंचितला प्रचारासाठी मोठा वेळ मिळालेला आहे. कारण, एक महिन्यानंतर मतदान होणार आहे. याकाळात उमेदवाराला मतदारसंघ पिंजून काढता येईल. पण, सातारा मतदारसंघाततरी वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर आतापर्यंततरी निष्प्रभच ठरल्याचे दिसून आलेले आहे. २०१९ मध्ये लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. त्यावेळी वंचितने सोलापूर जिल्ह्यातील सहदेव एेवळे यांच्या रुपाने उमेदवार दिला होता.
वंचितने निवडणुकीत जोरदार रान उठवले. पण, मतदानानंतर वंचितला अनामत रक्कमही वाचवता आली नाही. एेवळे यांना फक्त ४० हजार ६७३ मते मिळाली होती. यावेळी राष्ट्रवादीकडून निवडूण आलेल्या उदयनराजे भोसले यांना ५ लाख ७९ हजार मते मिळाली होती. तर निवडणुकीनंतर काही महिन्यातच उदयनराजेंनी राजीनामा दिल्यानंतर लोकसभेची पोटनिवडणूक झाली. त्यामध्येही वंचितला ताकद दाखवता आली नव्हती.
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भाजपकडून लढले. तर तत्कालिन कऱ्हाड मतदारसंघाचे खासदार राहिलेल्या श्रीनिवास पाटील यांना राष्ट्रवादीने साताऱ्यातून उमेदवारी दिलेली. यावेळीही महाविकास आघाडी आणि महायुतीतच सामना रंगला. यामध्ये श्रीनिवास पाटील यांनी बाजी मारली. तर वंचितचे उमेदवार चंद्रकांत खंडाईत यांना अवघी २६ हजारांवर मते घेता आली. विजयी उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्यापेक्षा ६ लाखांहून कमी मते वंचितला प्राप्त झालेली.
वंचितने दिला नवीन उमेदवार; निवडणुकीत ३ टक्क्यांपर्यंतच मते..
वंचित बहुजन आघाडीने सातारा लोकसभा मतदारसंघातून मारुती जानकर यांना उमेदवारी दिलेली आहे. जानकर यांचा आतापर्यंतचा प्रवास राष्ट्रीय समाज पक्ष, आम आदमी पार्टी ते वंचित असा राहिलेला आहे. वंचितने नवीन उमेदवार दिलेला आहे. तर २०१९ च्या निवडणुकीत वंचितच्या उमेदवाराने एकूण मतदानाच्या ३.६५ टक्के मते घेतली होती. तर विजयी उमेदवार उदयनराजेंना सुमारे ५२ टक्के मते मिळाली होती. त्याचबरोबर २०१९ च्याच लोकसभा पोटनिवणुकीत विजयी उमेदवार श्रीनिवास पाटील यांना ५१.४ टक्के मते मिळाली होती. तर वंचितच्या उमेदवाराला १.३८ टक्के मते घेता आली होती.
अनामत रक्कम जप्त कधी होते !
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, कोणत्याही निवडणुकीत उमेदवाराला एकूण वैध मतापैकी १/६ म्हणजेच १६.६७ टक्के मते मिळाली नाहीत, तर त्याचे डिपॉझिट जप्त केलं जातं. एखाद्या उमेदवाराला १६.६७ टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळाल्यास त्याची अनामत रक्कम परत केली जाते. याशिवाय विजयी उमेदवारांनाही डिपॉझिट परत मिळत असतं.