साताऱ्यात 'वंचित'च्या खेळीमुळे लढतीत वाढणार ट्विस्ट, माजी सैनिकाला दिली उमेदवारी
By दीपक देशमुख | Published: April 22, 2024 02:32 PM2024-04-22T14:32:15+5:302024-04-22T14:34:11+5:30
कोणावर होणार परिणाम?
दीपक देशमुख
सातारा : सातारा लोकसभेसाठी महायुतीतून खासदार उदयनराजे भोसले आणि महाविकास आघाडीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यात अटीतटीची लढत होत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूकडून छोट्या-मोठ्या नेत्यांना आणि गटांना आपलेसे करत ताकद वाढवण्याचा प्रयत्न होत असताना वंचितने आपला उमेदवार उभा केला आहे. २०१९ मध्ये ४६ हजार तर पोटनिवडणुकीला १७ हजार मते घेणारी वंचित बहुजन आघाडी यावेळी किती मते खाणार त्याचा परिणाम कोणावर होणार याची चर्चा आता सुरू झाली आहे.
गेल्यावेळच्या निवडणुकीमध्ये वंचितच्या भूमिकेमुळे भाजपचे आठ ते नऊ अतिरिक्त खासदार निवडून आल्याचा दावा महाविकास आघाडीच्या वतीने केला जात आहे. त्यामुळे महायुतीच्या विरोधात जी मते जाऊ शकतात, त्यांचे विभाजन होऊ नये, यासाठी महाविकास आघाडीत वंचितला सहभागी करून घेण्याचा प्रयत्नही करण्यात आला; परंतु वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यात जागा-वाटपाचे गणित न जुळल्याने वंचितने वेगळी भूमिका घेतली व निवडणुकीत राज्यात १९ ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. यामध्ये सातारा लोकसभेचाही उमेदवार आहे.
तसेच सातारा लोकसभेसाठी वंचितने निश्चित केलेली मारुती जानकर यांची उमेदवारी ऐनवेळी बदलून सैनिक फेडरेशनच्या मागणीनुसार प्रशांत कदम या माजी सैनिकाला दिली आहे. जिल्ह्यात सुमारे ८० हजार आजी-माजी सैनिक आहेत. २०१९ च्या लाेकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवाराने ४६ हजार मते घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादीतून लढणाऱ्या उदयनराजे भोसले यांचे मताधिक्य घटले होते;
परंतु या निवडणुकीत उदयनराजे महायुतीत आहेत. यामुळे महाविकास आघाडीच्या मतांचे वंचितमुळे विभाजन होईल, असा महायुतीच्या नेत्यांचा व्होरा आहे तर वंचितच्या उमेदवारामुळे परिणाम होणार नसल्याचा दावा महाविकास आघाडीकडून होत आहे. निवडणुकीचे घाेडा मैदान जवळ आले असून वंचितच्या उमेदवारामुळे नेमकी राजकीय गणिते कशी बदलतात हे निकालानंतरच समजणार आहे.